बेळगाव जिल्हा पंचायत महिला व बालकल्याण विभाग बाल विकास प्रकल्प आणि बेळगाव उत्तरचे आमदार ॲड. अनिल बेनके यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित भाग्यलक्ष्मी बॉंड वितरण कार्यक्रम आज शनिवारी उत्साहात पार पडला.
भडकल गल्ली येथील बनशंकरी कार्यालयामध्ये आयोजित या कार्यक्रमाचे उद्घाटन व्यासपीठावरील मान्यवरांच्या हस्ते झाडाच्या रोपट्याला पाणी घालण्याद्वारे झाले. याप्रसंगी बोलताना आमदार ॲड. अनिल बेनके यांनी ‘बेटी बचाव -बेटी पढाव’ हा नारा देत मुख्यमंत्री बी.एस. यडियुरप्पा यांनी भाग्यलक्ष्मी योजना सुरू केली आहे.
या योजनेअंतर्गत 18 वर्षे पूर्ण झालेल्या मुलींना शिक्षणाकरता 1 लाख रुपये निधी उपलब्ध होणार आहे. जवळपास 5360 जणांना भाग्यलक्ष्मी योजनेचा बॉण्ड वितरित करण्यात आला आहे, असे सांगितले.
भाग्यलक्ष्मी योजनेची माहिती देताना मुलांना जास्तीत जास्त 25 हजार रुपये पर्यंत आरोग्य विमा संरक्षण मिळते. मुलीला दहावीपर्यंत वर्षाला 300 ते 1000 रुपये शिष्यवृत्ती दिली जाते. अर्ज केवळ मुलींचे आई-वडील व नैसर्गिक पालक करू शकतात. दारिद्र रेषेखालील ओळखल्या जाणाऱ्या आर्थिक दृष्ट्या कमकुवत कुटुंबामध्ये मुलीच्या जन्माला प्रोत्साहन देण्यासाठी ही योजना आहे.
मुलींचा दर्जा उंचावला तर समाजाचा दर्जा उंचावतो. कांही अटींच्या पूर्ततेच्या अधीन राहून मुलीला तिच्या आई-वडील अथवा नैसर्गिक पालकांद्वारे आर्थिक सहाय्य प्रदान करणे या लाभांव्यतिरिक्त पालकांना अपघात झाल्यास 1 लाख रुपये आणि लाभार्थींच्या नैसर्गिक मृत्यूसाठी 42 हजार 500 रुपये मिळतात. 18 वर्षाच्या अखेरीस लाभार्थीला 34 हजार 751 रुपये दिले जातील. पात्रता निकषांची सतत पूर्तता केल्यावर कांही अंतरिम देयके जसे की वार्षिक शिष्यवृत्ती आणि विमा लाभ लाभार्थींना उपलब्ध करून दिले जातील असे सांगून आज भडकल गल्ली येथे या बॉण्डचे वितरण करण्यात आले तसे उद्या रविवारी हनुमाननगर येथेही या पद्धतीने बॉंड वितरण करण्यात येणार आहेत. तरी नागरिकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन शेवटी आमदार ॲड. अनिल बेनके यांनी केले.
तसेच अधिक माहितीसाठी आणि भविष्यातील फायद्यांसाठी संबंधित महिला आणि बाल कल्याण उपसंचालक किंवा बाल विकास प्रकल्प अधिकारी अथवा नजीकच्या अंगणवाडी कार्यकर्त्यांची संपर्क साधावा असेही त्यांनी स्पष्ट केले.
बनशंकरी देवस्थानातील आजच्या कार्यक्रमाप्रसंगी नगरसेवक फिरोज मुल्ला, शकील मुल्ला, सीडीपीओ लक्ष्मण बजंत्री, विलास केरुर आदींसह अंगणवाडी शिक्षिका सहाय्यक शिक्षिका तसेच लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.