स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत हाती घेण्यात आलेले सीबीटी अर्थात बेळगाव मध्यवर्तीय बस स्थानकाच्या नूतनीकरणाचे काम येत्या डिसेंबर पूर्वी वेळेत पूर्ण करावे, अशी सक्त सूचना जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी केली आहे.
स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत बेळगाव शहरात सुरू असलेल्या विविध विकास कामांची आज सोमवारी जिल्हाधिकारी पाटील यांनी पाहणी केली. यावेळी त्यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना उपरोक्त सूचना केली. सीबीटी शेजारील जागेच्या न्यायालयीन वादातून मिळालेल्या स्थगिती आदेशामुळे सीबीटीच्या नूतनीकरणाचे काम पूर्ण होण्यास विलंब लागला असल्याची माहिती यावेळी बेळगाव स्मार्ट सिटी लिमिटेडचे संचालक डॉ प्रवीण बागेवाडी यांनी दिली. आता स्थगिती उठल्यामुळे बसस्थानकाचे काम वेळेत पूर्ण केले जाईल असेही सांगितले.
आपल्या पाहणी दौऱ्यादरम्यान जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी टिळकवाडी येथील 46 कोटी रुपये खर्च करून नव्याने उभारण्यात येत असलेल्या कलामंदिरच्या बांधकाम ठिकाणी भेट दिली. कलामंदिर इमारतीचे बहुतांश बांधकाम पूर्ण झाले असल्यामुळे उर्वरित काम देखील डिसेंबरपर्यंत पूर्ण करावे असे जिल्हाधिकाऱ्यांनी सुचित केले. कलामंदिर शेजारी जागेतील विकास कामाला न्यायालयाचा स्थगिती आदेश मिळाला आहे.
तो स्थगिती आदेश लवकरात लवकर उठवला जाईल या दृष्टीने प्रयत्न करून संबंधित जागेतील विकास काम देखील हाती घेण्यात यावे असेही त्यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना सांगितले. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी हर्षा शोरूम नजीकच्या जीएसटी कार्यालयासमोरील स्मार्ट सिटीच्या रस्त्याचे व्हाईट टॉपिंग आणि पेव्हर्स बसवण्याच्या कामाची पाहणी केली.
सध्या पाऊस असल्यामुळे हे काम ऑक्टोबरपर्यंत पूर्ण झाले पाहिजे असे सांगून प्रत्येक काम गुणवत्तापूर्ण दर्जेदार करावे अशी सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी केली. याप्रसंगी स्मार्ट सिटीचे संचालक डॉ. प्रवीण बागेवाडी, मुख्य अभियंता चंद्रशेखर यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित होते.