गेल्या चार पिढ्या शाडू पासून गणेश मूर्ती बनवण्याचे काम भडकल गल्ली येथे पालकर कुटुंबीय करत आले आहे. त्यांच्या घराण्यातील पाचवी पिढी शाडूपासून गणेश मूर्ती बनवण्याच्या कामात मग्न आहे.
कॅन्टोन्मेंट बोर्ड मराठी शाळेत इयत्ता दुसरीत शिकणारा विद्यार्थी श्रीनय परशराम पालकर शाडू पासून लहान, लहान मूर्ती घडवण्याचे काम करत आहे.
गणेश मूर्ती बनवण्याचे काम गुढी पाडव्यापासून सुरू होते. तेव्हापासून लहानग्याने श्री मूर्ती घडवण्याच्या कामात मदत करत आहे. यंदा भोपळ्यावर बसलेला बालगणेश, सिंहासनावर आराम बसलेली मूर्ती करण्याच्या कामात त्याने मदत केली आहे.
पालकर कुटुंबीय हे मूळचे गर्लगुंजीचे (ता. खानापूर ) असून ते नोकरी व्यवसाय, निमित्त सध्या बेळगावला स्थायिक झाले आहे. शाडू पासून मूर्ती बनवणे हा त्यांचा पिढी जात व्यवसाय आहे. हनमंत पालकर, रामचंद्र पालकर, यल्लाप्पा पालकर, परशराम पालकर असा मूर्ती बनवण्याचा क्रम आहे.
गेल्या तीन वर्षापासून मराठा लाईट इन्फंट्री चा मिलिटरी महादेव मंदिर मधील सार्वजनिक शाडूचा गणेश मूर्ती बनवण्याचे काम पालकर कुटुंबीय करत आहे. दरवर्षी पर्यावरण पूरक मूर्ती करण्यावर त्यांचा भर असतो. ऑर्डरी प्रमाणे गणेश भक्तांना गणेश मूर्ती बनवून देण्याचे काम पालकर कुटुंबीय करत आले आहे.
सध्या या घराण्यामध्ये तन्मय व श्रीनय असे दोन बालकलाकार शाडू पासून गणेश मूर्ती बनवण्याचे काम करत आहेत.