Thursday, January 9, 2025

/

बालिका आदर्श मधील बॉक्सिंग रिंग-कुस्ती क्रीडा संकुलाचे उद्घाटन

 belgaum

टी.एफ.ई. सोसायटीच्या टिळकवाडी येथील बालिका आदर्श विद्यालयातील बॉक्सिंग आणि कुस्ती क्रीडा संकुलाचा उद्घाटन समारंभ आज सकाळी उत्साहात पार पडला.

बालिका आदर्श विद्यालयाच्या सौ संगीता देसाई सभागृहामध्ये या उद्घाटन समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. टी.एफ.ई. सोसायटीच्या व्हाईस चेअरमन रोहिणी गोगटे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या समारंभास बॉक्सिंग आणि कुस्ती रिंगचे पुरस्कर्ते स्टफ इंडिया (जर्मन कंपनी) पुण्याचे सीईओ बी. पी. चिरमोरे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्याचप्रमाणे विशेष अतिथी म्हणून अर्जुन पुरस्कार विजेते ज्येष्ठ बॉक्सर मुकुंद किल्लेकर आणि माजी आं. रा. कुस्तीपटू व कुस्ती प्रशिक्षक मारुती घाडी यांच्यासह शाळेचे मुख्याध्यापक एन. ओ. डोणकरी व एम. आय. गोलीहळी व्यासपीठावर उपस्थित होते. प्रारंभी शाळेचे शिक्षक विश्वास गावडे यांनी उपस्थितांचे स्वागत व पाहुण्यांचा परिचय करून दिला प्रास्ताविक सेवानिवृत्त प्रा. आनंद गाडगीळ यांनी केले. यावेळी प्रमुख पाहुणे बिपिन चिरमोरे यांच्या हस्ते फित कापून बॉक्सिंग आणि कुस्ती क्रीडा संकुलाचे उद्घाटन करण्यात आले.

आपल्या उद्घाटनपर भाषणात चिरमोरे यांनी सध्या पुण्याला राहत असलो तरी आपण मूळचे बेळगावचे असल्याचे स्पष्ट केले. बेळगावचा असल्यामुळे या शहरासाठी कांहीतरी करायची माझी इच्छा होती, त्यातूनच या बॉक्सिंग व कुस्ती क्रीडा संकुलासाठी आपण मदत केली आहे. भविष्यात बेळगाव येथील क्रीडापटूंनी बॉक्सिंग आणि कुस्ती क्रीडा प्रकारात स्वतःचे आणि आपल्या शहराचे नांव उज्वल करावे. बालिका आदर्शसह बेळगावातील फक्त शालेय मुलींसाठी हे बॉक्सिंग व कुस्ती क्रीडा संकुल खुले राहील. याचा उदयन्मुख क्रीडापटूंनी लाभ घ्यावा, असे आवाहनही बिपिन चिरमोरे यांनी केले.Balika adarsh

कार्यक्रमास टी.एफ.ई. सोसायटीचे संचालक, सभासद, शाळेतील शिक्षक तसेच प्रा माधुरी शानबभाग, लता कित्तुर, विश्वास पवार, अनंत सोमनाचे आदी निमंत्रित मंडळींसह शाळेतील विद्यार्थिनी बहुसंख्येने उपस्थित होत्या. शेवटी शिक्षक विजय पार्लेकर यांनी सर्वांचे आभार मानले. बालिका आदर्श विद्यालयातील बॉक्सिंग व कुस्ती क्रीडा संकुलमध्ये बॉक्सिंग प्रशिक्षक म्हणून मुकुंद किल्लेकर आणि कुस्ती प्रशिक्षक म्हणून मारुती घाडी काम पाहणार आहेत.

प्रमुख पाहुणे बिपीन चीरमोरे, सीईओ, स्टफ इंडिया (जर्मन कंपनी) यांनी बालिका आदर्श विद्यालयाला बाॅक्सींग रींग आणि मॅटवरील कुस्ती आखाडा तयार करून दिला आहे. राष्ट्रीय मिलीटरी स्कूल नंतर संपूर्ण कर्नाटकातील शाळांमध्ये फक्त बालिका आदर्शमध्ये ही क्रीडा सुविधा उपलब्ध आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.