प्रसुतीसाठी आलेल्या महिलेवरील सिझेरीन शस्त्रक्रियेप्रसंगी जन्मणाऱ्या मुलाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना आज सकाळी बेळगाव सिव्हिल हॉस्पिटलमध्ये घडली असून मुलाच्या मृत्यूस डॉक्टरच जबाबदार असल्याचा आरोप महिलेच्या कुटुंबीयांनी केला आहे.
याबाबत समजलेली माहिती अशी की, सुनिता उचगावकर ही महिला प्रसुतीसाठी आठ दिवसापूर्वी 14 जुलै रोजी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल झाली होती. सुनिता हिला आधीच एक मूल असून तिची पहिली प्रसूती सर्वसामान्य नॉर्मल झाली आहे. सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल झाल्यानंतर तपासणीअंती डॉक्टरांनी ही दुसरी प्रसुती देखील सर्वसामान्य (नॉर्मल डिलिव्हरी) होईल असे सांगितले होते. त्यासाठी काल तिला आवश्यक औषधही देण्यात आले होते. तथापि आज बुधवारी सकाळी डॉक्टरांनी अचानक प्रसूतीसाठी सिझेरियन शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला.
सदर शस्त्रक्रियेप्रसंगी डॉक्टरांच्या दुर्लक्ष व बेजबाबदारपणामुळे आमच्या मुलाचा मृत्यू झाला, असा आरोप महिलेच्या कुटुंबीयांनी केला आहे. त्याचप्रमाणे या संदर्भात आपल्याला न्याय मिळावा अशी मागणी करत या कुटुंबीयांनी आक्रमक पवित्रा घेतल्यामुळे हॉस्पिटलच्या प्रसुती वार्डामध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. कुटुंबीयांचा आक्रोश आणि आरडाओरडीमुळे प्रसूती वाॅर्डसमोर बघायची एकच गर्दी झाली होती.
मिळालेल्या माहितीनुसार नाळेत गुरफटल्यामुळे मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याचे समजते. या संदर्भात बोलताना डॉक्टरांकडून कोणतेही दुर्लक्ष अथवा बेजाबाबतदारपणा झालेला नाही, असे हॉस्पिटलचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. अण्णासाहेब पाटील यांनी स्पष्ट केले आहे. तथापि या प्रकरणी चौकशी करून कारवाई केली जाईल, असेही डॉ. पाटील यांनी स्पष्ट केले आहे.
दरम्यान, बेळगावचे प्रांताधिकारी तथा सिव्हिल हॉस्पिटल अर्थात बिम्सचे कर्तव्यदक्ष प्रशासक अमलान आदित्य बिश्वास यांची सरकारने अन्यत्र बदली केली आहे. बिश्वास यांच्या बदलीनंतर कांही दिवसातच उपरोक्त प्रकार घडल्यामुळे आता पुन्हा सिव्हिल हॉस्पिटलमधील अनागोंदी कारभाराला प्रारंभ झाला की काय? अशी शंका व्यक्त केली जात आहे.