बेळगाव शहरातील बीम्स हॉस्पिटलमधील नूतनीकरण करण्यात आलेल्या पेडियाट्रीक वाॅर्ड्स, शिशुविहार (बेबी सिटिंग) आणि दिव्यांग रुग्णांसाठीचा काउंटर यांचा उद्घाटन समारंभ आज शुक्रवारी उत्साहात पार पडला.
बीम्स हॉस्पिटलमध्ये आज दुपारी आयोजित या समारंभास उद्घाटक म्हणून बेळगाव उत्तरचे आमदार ॲड. अनिल बेनके उपस्थित होते. त्यांच्या हस्ते नूतनीकरण केलेल्या पेडियाट्रीक वाॅर्ड्स, शिशुविहार आणि दिव्यांग रुग्णांसाठीच्या काउंटरचे फीत कापून उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी प्रादेशिक आयुक्त व बिम्सचे प्रशासक अमलान आदित्य बिश्वास, बीम्सचे संचालक डॉ. विवेकी यांच्यासह हॉस्पिटलमध्ये वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते. उद्घाटनानिमित्त नूतनीकरण करण्यात आलेल्या विभागांची फुगे आणि फुलांनी लक्षवेधी सजावट करण्यात आली होती. या ठिकाणी शिशुविहारमध्ये चिमुकली मुले उपचारांती लवकर बरी व्हावीत तसेच त्यांना उपचारादरम्यान विरंगुळा मिळावा याकरिता भिंतीवर वेगवेगळी चित्र रेखाटण्यात आली आहेत.याशिवाय पडदे, उशी, बेडशीट हे देखील लहान मुलांच्या खेळण्याप्रमाणेच रंगबिरंगी ठेवण्यात आले आहेत.
उद्घाटन समारंभानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना आमदार ॲड. अनिल बेनके म्हणाले की, देशातील दर्जेदार हॉस्पिटल्सच्या यादीमध्ये उत्तर कर्नाटकातील बेळगावचे हे बीम्स हॉस्पिटल सध्या देशात 12 व्या क्रमांकावर आहे. सदर हॉस्पिटलबद्दल गेल्या सात-आठ महिन्यापूर्वी जनतेमध्ये नकारात्मक प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात होत्या. मात्र प्रादेशिक आयुक्त अमलान आदित्य बिश्वास यांनी प्रशासक म्हणून या हॉस्पिटलची सूत्रे हाती घेतल्यानंतर या हॉस्पिटलचा कायापालट झाला आहे. कॉर्पोरेट हॉस्पिटल पेक्षा बेळगावचे हे हॉस्पिटल सुंदर झाले आहे. बेळगावातील खाजगी हॉस्पिटल पेक्षा बीम्स हॉस्पिटल मधील नव्याने बांधण्यात आलेले शिशुविहार हे कित्येक हजार पटीने उत्तम असल्याचे मतही आमदार बेनके यांनी व्यक्त केले.
येत्या काळात या ठिकाणी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल त्याचबरोबर ट्राॅमा सेंटर, मदर अँड चाइल्ड स्पेशालिटी हॉस्पिटल, नर्सिंग ट्रेनिंग सेंटर व हॉस्टेल असे चार महत्त्वाकांक्षी प्रकल्प राबविले जाणार आहेत. एकंदर या पद्धतीने वर्षभरात देशातील पहिल्या पाच क्रमांकाच्या हॉस्पिटल्समध्ये बीम्सचे नांव येईल यासाठी आमचा प्रयत्न असणार आहे असे सांगून जनतेने यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन आमदार ॲड. बेनके यांनी केले. आजच्या या उद्घाटन समारंभाचे औचित्य साधून आमदारांच्या हस्ते हॉस्पिटलमधील प्रशिक्षणार्थी मागासवर्गीय डॉक्टरांना लॅपटॉपचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी नगरसेवक मुरगेंद्रगौडा पाटील,श्रेयश नाकाडी, प्रवीण पाटील यांच्यासह हॉस्पिटल मधील डॉक्टर्स, नर्स, वैद्यकीय कर्मचारी आणि हितचिंतक बहुसंख्येने उपस्थित होते.