बकरी ईद सणाच्या पार्श्वभूमीवर बेकायदेशीर रित्या जनावरांची वाहतूक होऊ नये यासाठी पोलीस खात्याच्यावतीने विशेष खबरदारी घेण्यात येत असून ठीकठिकाणी चेक पोस्ट सुरू करण्यात आले आहेत.
मुस्लिम बांधवांचा बकरी ईद सण येत्या रविवारी आहे. त्यामुळे हा सण उत्साहात व शांततेत पार पडावा, सणासुदीच्या दिवशी कोणत्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये, समाजातील शांततेला धक्का पोहोचू नये यासाठी पोलीस प्रशासन विशेष खबरदारी घेत आहे.
शहरातील प्रार्थना स्थळांबरोबरच संवेदनशील आणि अतिसंवेदनशील परिसरात पोलिसांची गस्त वाढविण्यात आली आहे. या काळात जनावरांची मोठ्या प्रमाणात कत्तलखान्याकडे वाहतूक केली जाते. त्यामुळे त्याला विविध संघटनांकडून विरोध केला जातो. परिणामी व तणावाचे वातावरण निर्माण होण्याची शक्यता असल्यामुळे पोलीस खात्याने गेल्या आठ दिवसापासून शहरात ठीक ठिकाणी चेक पोस्ट उभारले आहेत.
सदर चेकपोस्टच्या ठिकाणी 24 तास पोलिसांची नियुक्ती करण्यात आली असून शहरात येणाऱ्या बाहेर जाणाऱ्या सर्व प्रकारच्या मालवाहू वाहनांची तपासणी केली जात आहे. त्याचबरोबर त्या वाहनांचे नंबर देखील नोंद करून घेतले जात आहेत. पोलीस खात्याच्या या कृतीचे सर्वत्र स्वागत होत आहे.