बेळगाव महानगरपालिकेची निवडणूक होऊन 11 महिने उलटले तरी अद्याप महापौर उपमहापौर निवडणूक झाली नसल्याने निवडून आलेले नगरसेवक सभागृहात कधी जाणार याकडे डोळे लावून बसले आहेत.
नुकताच काँग्रेस आणि म ए समितीच्या नूतन नगरसेवकांनी प्रादेशिक आयुक्तांना निवेदन देऊन लवकरात लवकर महापौर निवडणूक घ्या अशी मागणी केली होती त्यामुळे बेळगाव महापालिकेची महापौर उपमहापौर निवडणूक कधी होणार हा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.
बेळगाव महापालिकेची महापौर निवडणूक आगामी पंधरा दिवसात होईल अशी शक्यता महापालिकेच्या सूत्रांनी व्यक्त केली आहे. नूतन नगरसेवकांना प्रशासकीय प्रशिक्षण देण्याची आणि इतर गोष्टींची तयारी महापालिका प्रशासनाने चालवली आहे अशी माहिती उपलब्ध झाली आहे. दरम्यान प्रादेशिक आयुक्त अमलान विश्वास यांनी महापौर निवडणूक लवकर घ्यावी अशा आशयाचे पत्र राज्य सरकारला मागील महिन्यातच लिहिले होते त्या अनुषंगानेच मनपा प्रशासनाने महापौर निवडणुकीसाठी नगरसेवकांच्या बाबतीत प्रशिक्षण देण्याची तयारी चालवली आहे अशीही माहिती आहे.
निवडणूक होऊन ११ महिने उलटले मात्र अद्याप निवडणूक नाही यासाठी जबाबदार कोण याबाबत जनतेत उलट सुलट प्रतिक्रिया व्यक्त होत असून अनेकांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. निवडणूक झाली मात्र सभागृह अद्याप अस्तित्वात नाही याबद्दल जनतेत आणि निवडून आलेल्या नगरसेवकांत देखील नाराजीचा सूर ऐकावयास मिळत आहे.
महापौर पदी सामान्य महिला तर उपमहापौर पद ए ओबीसी महिलेसाठी आरक्षित आहे.एकुणच मनपा महापौर निवड लवकर व्हावी आणि सभागृह अस्तित्वात यावे अशी जोरदार मागणी होऊ लागली आहे.