मुस्लिम बांधवांचा बकरी ईद हा सण शहर आणि परिसरात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. दोन वर्षापासून कोरोनामुळे या सणांचा आनंद मुस्लिम बांधवांना घेता आला नव्हता. यामुळे पावसाची रिपरिप सुरू असताना देखील सामूहिक नमाज पठण करत मुस्लिम बांधवांनी सामूहिकरीत्या या सणाचा आनंद घेतला.
विविध मशिदींमध्ये सकाळी ईदच्या नमाजचे आयोजन करण्यात आले होते. अंजुमन संस्थेतर्फे शहरातील ईदगाह मैदानावर सकाळी ९ वाजता ईदची सामुहिक नमाज अदा करण्यात आली. पाऊस असूनही ईदगाह मैदानावर झालेल्या नमाजात मोठ्या संख्येने मुस्लिम बांधव सहभागी झाले होते.
नमाज पठण केल्यानंतर सर्वांनी परस्परांना बकरीच्या शुभेच्छा देत या सणाचा आनंद द्विगुणित केल्याचे चित्र पाहायला मिळाले. यावेळी बालचमुंचा सहभाग देखील मोठा असल्याचे दिसून आले.यावेळी बोलतांना मुफ्ती अब्दुल अजिज काझी यांनी बकरी ईद या सणाचे महत्त्व सांगितले.
बकरींची जोरदार खरेदी
ईदच्या निमित्ताने या दिवशी जनावराचा बळी दिला जातो. यामुळे बकरी ईदच्या पूर्वसंध्येला लाखो रुपयांची बकऱ्यांची खरेदी करण्यात आली. यामुळे मुस्लिम भागामध्ये मोठ्या प्रमाणात सामूहिक दावत चे आयोजन करण्यात आले होते. नवनवीन कपडे परिधान करून मुस्लिम बांधव एकमेकांना बकरी ईदच्या शुभेच्छा देताना पाहायला मिळाले.
गरिबांना मदत करण्याचे आवाहन
या सणाच्या निमित्ताने गरजूंना दान दिले जाते. आर्थिक परिस्थितीनुसार गरीब लोकांना मदत केली जाते. कोरोना नंतरच्या परिस्थितीमुळे गरीबांना मदत करण्याचे आवाहन सामूहिक नमाज पठण दरम्यान करण्यात आले.
यावेळी माजी आमदार फिरोज सेठ, अंजुमन इस्लाम संघटनेचे अध्यक्ष राजू सेठ व इतर मुस्लिम नेत्यांनी सर्वाना बकरी ईद सणाच्या शुभेच्छा दिल्या. त्याचवेळी एसीपी नारायण भरमनी आणि इतर पोलीस अधिकाऱ्यांनीही मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिल्या. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.