कामत गल्ली, बेळगाव येथील अनिकेत मारुती शहापूरकर याने अलीकडेच घेण्यात आलेल्या चार्टर्ड अकाउंटंट परीक्षेमध्ये उत्तीर्ण होत अभिनंदन यश मिळविले आहे.
बेळगाव शहरातील कामत गल्ली येथील प्रतिष्ठित नागरिक मारुती शहापूरकर यांचा चिरंजीव असलेल्या अनिकेत याचे प्राथमिक माध्यमिक शालेय शिक्षण ओरिएंटल इंग्लिश मीडियम हायस्कूलमध्ये झाले आहे. गोगटे कॉलेज ऑफ कॉमर्समधून बीकॉम पदवी संपादन करणारा अनिकेत आता गेल्या मे 2022 मध्ये घेण्यात आलेल्या सीए परीक्षेमध्ये उत्तीर्ण झाला आहे.
त्यामुळे तो इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट ऑफ इंडिया संस्थेचा मान्यता पात्र चार्टर्ड अकाउंटंट झाला आहे. आपल्या यशासंदर्भात बोलताना अनिकेत शहापूरकर याने सीए परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी मोठे परिश्रम घ्यावे लागतात असे सांगून आपण योग्य वेळापत्रक आखून दिवसातील 12 तास मनःपूर्वक अभ्यास करत होतो असे स्पष्ट केले.
तसेच सीए होऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना संदेश देताना यशासाठी कोणताही शॉर्टकट नसतो. जीवनात काहींही साध्य करावयाचे असल्यास कठीण परिश्रम हीच त्याची गुरुकिल्ली आहे, असे अनिकेतने स्पष्ट केले.
अनिकेत शहापूरकर याने आपल्या यशाचे श्रेय आपले आई-वडील, एमबीए झालेला आपला भाऊ अजय शहापूरकर, प्राचार्य, मेसर्स डी. बी. कुलकर्णी अँड कंपनीचे सीए संजय व्ही. कुलकर्णी, सीए ज्योती जी. मठद, कार्यालयातील वरिष्ठ सहकारी, शाळा व कॉलेजमधील शिक्षकवर्गाला दिले आहे.
सर्वसामान्य कुटुंबातून येऊन अनिकेत शहापूरकर याने अत्यंत अवघड चार्टर्ड अकाउंटंट (सीए) परिक्षेत मिळविलेल्या यशाचे सर्वत्र कौतुक होत असून त्याच्यावर अभिनंदनचा वर्षाव होत आहे.