पंढरीचे सुख नाही त्रिभुवनी,
प्रत्यक्ष चक्रपाणी उभा असे, अशीच भावना प्रत्येक विठूभक्ताची असते. पंढरीचे सुख हे त्रिभुवनात सामावणार नाही असेच असते. यामुळेच आपल्या व्यस्त कामातून देखील वेळ काढत ते पंढरीला जात होते. प्रत्यक्ष परमात्मा विठुराया आहे अशी भावना त्यांच्या मनी होती. मात्र विठुरायाचे दर्शन घेण्याआधीच काळाने घाला घातला आणि पंढरीचे सुख अनुभवण्यापूर्वीच त्या वेड्या भक्तांची एक्झिट झाली.
सुख अनुभवण्यापूर्वीच त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला. आणि त्या भक्तांची एक्झिट बेळगावकराच्या मनाला चटका लावून गेली. आणि आषाढीचा आनंद दुःखात विरून गेला.आषाढी एकादशी निमित्त पंढरपूरला पांडुरंगाच्या भेटीला जाणाऱ्या बेळगावच्या वारकऱ्यांवर काळाचा घाला पडला आणि विठ्ठलाच्या भेटीपूर्वीच प्रसिद्ध फोटोग्राफर राजू संभाजी शिंदोळकर वय 45 आणि सामाजिक कार्यकर्ते परशराम संभाजी झंगरुचे वय 50 दोघेही राहणार भांदुर गल्ली अनगोळ या विठू भक्तांना जगाचा निरोप घ्यावा लागला.
आषाढी एकादशी निमित्त पंढरपूरला विठूरायाच्या दर्शनाला अनगोळ बेळगावचे पाच जण जात होते सांगोल्या जवळ त्यांची कार पलटी होऊन झालेल्या अपघातात दोघांचा मृत्यू झाला आहे. तर अन्य तिघे जखमी झाले आहेत.जखमींवर पंढरपूर येथील इस्पितळात उपचार सुरू आहेत.
पंढरपूर सांगोला रोडवर कासेगाव फाट्याजवळपास शनिवारी मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास कार पलटी झाल्याने हा अपघात घडला आहे. पंढरीच्या विठुरायाच्या दर्शनाची आस मनी बाळगून हे पाच भक्त शनिवारी रात्री पंढरपूरला जाण्यासाठी निघाले होते . आनंदाचे उत्साहाचे भरते मनात बाळगत सर्वजण काही वेळात विठ्ठलाचे दर्शन घेणार म्हणून आनंदात होते. मात्र तत्पूर्वी झालेल्या या अपघातामुळे दोन वारकऱ्यांचे प्राण गेले आहेत.
जो आवडे सर्वांना तोचि आवडे देवाला असे म्हटले जाते त्याप्रमाणेच व्यवसायाने फोटोग्राफर असणारे राजू संभाजी शिंदोळकर हे मनमिळावू आणि मदतीला धावणारे व्यक्तिमत्व होते. अनगोळ भागात त्यांचे फोटो स्टुडिओ असल्याने ते बेळगावात सर्वांना परिचित होते महाराष्ट्र एकीकरण समितीचे कट्टर कार्यकर्ते होते त्यांच्या अचानक जाण्याने सर्वांनाच धक्का बसला असून ही बातमी समजतात अनेकांच्या डीपी स्टेटस वर त्यांचे चित्र पाहायला मिळाले.
तर परशराम संभाजी झंगरुचे हे देखील उद्यमबाग येथे काम करत होते. यामुळे यांना ओळखणारा कामगार वर्ग मोठा आहे. सुट्टीचा दिवस असल्याने आषाढीनिमित्त ते पंढरपूरला गेले होते. आदल्या दिवशी आपल्यासोबत काम करणारी व्यक्ती अचानक गेल्याने सर्वांनाच धक्का बसला आहे.
तर अभिजित हुंदरे वय28, गीतेश कोकितकर वय 26 आणि राजू कृष्णा मजुकर वय 26 (वाहन चालक) सर्वजण रा. अनगोळ बेळगाव अशी जखमींची नावे आहेत.
एकीकरण समितीचे कार्यकर्ते म्हणून राजू शिंदोळकर नेहमी कार्यरत होते याशिवाय इतर वारकरी देखील समितीच्या कार्यात मदत करत होते यामुळे नूतन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दखल घेत महाराष्ट्र सरकारने याची दखल घेऊन अपघातात मृत व जखमी झालेल्यांना मदत जाहीर करावी अशी मागणी केली जात आहे. अपघातात मृत झालेल्यांचे मृतदेह सायंकाळपर्यंत बेळगावात दाखल होणार असून त्यानंतर त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत अशी माहिती उपलब्ध झाली आहे.