शंभर टक्के कर वसुलीसह सरकारी योजनांच्या यशस्वी अंमलबजावणीबद्दल येळ्ळूर ग्रामपंचायतीला बेळगाव जिल्ह्यातील ‘सर्वोत्तम सक्रिय ग्रामपंचायत’ म्हणून पुरस्कार मिळाला आहे
येळ्ळूर ग्रामपंचायत अध्यक्ष सतीश बा. पाटील आणि पीडीओ अरुण नाईक या जोडगोळीचे मार्गदर्शन आणि यशस्वी नेतृत्वामुळे येळ्ळूर ग्रामपंचायतची बेळगाव जिल्ह्यातील सर्वात सक्रिय ग्रामपंचायत म्हणून निवड करण्यात आली आहे. सदर ग्रामपंचायत ही जिल्ह्यातील अत्यंत क्रियाशील ग्रामपंचायत म्हणून ओळखली जाते. आपल्या कार्यक्षेत्रातील सर्व विकासकामे यशस्वीरित्या राबविण्यात ही ग्रामपंचायत आघाडीवर असते.
यासंदर्भात बेळगाव Live ला माहिती देताना ग्रामपंचायत अध्यक्ष सतीश बा. पाटील म्हणाले, कचरा निर्मूलनांबाबत एसडब्ल्यूएम ही ओला कचरा व सुका कचरा वेगवेगळ्या करून त्याची विल्हेवाट लावण्याची योजना आहे. त्याची आम्ही विशेष कचरा गाडी तैनात करून अंमलबजावणी करत आहोत. संपूर्ण गावात याची अंमलबजावणी सध्या सुरू नसली तरी व्यावसायिक परिसरात प्लास्टिक वगैरे कचरा गोळा करून त्याची विल्हेवाट लावली जात आहे. जलजीवन मिशन या 24 तास पाण्याच्या योजनेची सुद्धा अंमलबजावणी सुरू असून ती अंतिम टप्प्यात आहे. या योजनेअंतर्गत अंगणवाड्या आणि शाळांसाठी शुद्ध पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. अंगणवाड्यांची आवारं पेव्हर्स घालून नीटनेटकी करण्यात आली आहेत.
ग्रामपंचायतची कर वसुली ही 100 टक्के आहे. रोजगार हमी योजनेसह इतर योजनांची ही उत्तम अंमलबजावणी केली जात आहे. पंचायत कार्यालयाचा विकास करण्यात आला असून सुसज्ज कॉन्फरन्स हॉलची निर्मिती करण्यात आली आहे. डिजिटल लायब्ररी देखील सुरू करण्यात आली आहे. ॲडिशनल चीफ सेक्रेटरी एल के अतिक यांनी नुकतीच येळ्ळूर ग्रामपंचायतीला भेट देऊन पाहणी केली होती. या पाहणीअंती विकास कामांचा आढावा घेऊन येळ्ळूर ग्रामपंचायतीला जिल्ह्यातील सर्वात सक्रिय ग्रामपंचायत म्हणून पुरस्कार देण्यात आला आहे, असे अध्यक्ष सतीश पाटील यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, बेंगलोर येथील विकाससौध येथे राज्यातील 30 जिल्ह्यांमधील 30 ग्रामपंचायतींच्या अध्यक्ष आणि पंचायत विकास अधिकारी (पीडीओ) यांचे ग्रामपंचायत दूरदृष्टी कृती आराखडा योजनेसंदर्भातील प्रशिक्षण शिबिर नुकतेच पार पडले. या शिबिरात बेळगाव जिल्ह्यातून एकमेव येळ्ळूर ग्रामपंचायतचा सक्रिय ग्रामपंचायत म्हणून समावेश होता हे विशेष होय.
बेंगळूर येथे काल शुक्रवारी 8 जुलै रोजी कर्नाटकातील 30 जिल्ह्यांमधील 30 ग्राम पंचयातच्या अध्यक्ष व पिडिओ यांना बेंगळूर येथे बोलावून पुढील 5 वर्षाच्या ग्राम पंचायत दूरदृष्टी कृती आरखाडा योजनेबाबत प्रशिक्षण देण्यात आले. यामध्ये सर्वात कृतिशील असल्याने बेळगांव जिल्ह्यातील एकमेव येळ्ळूर ग्राम पंचायतीचा समावेश होता. यावेळी एडिशनल चीफ सेक्रेटरी एल. के. अतिक बेंगळूर तसेच पंचायत राज कमिश्नर आइ.ए.एस शिल्पा वर्मा यांनी योजनेसंदर्भात मार्गदर्शन केले. बेळगांव जिल्हा पंचायत उपकार्यदर्शी बसवराज हेगनायक हे ही यावेळी उपस्थित होते.
याप्रसंगी ग्राम पंचायत विकासासंदर्भात येळ्ळूर ग्राम पंचायत अध्यक्ष सतीश बा. पाटिल व पीडिओ अरुण नाईक यानी पुढील पाच वर्षाच्या दूरदृष्टी योजनेच्या विकास कामांसंदर्भात विचार मांडले. येळ्ळूर ग्रामपंचायतीकडून सरकारी योजना जनतेपर्यंत पोहोचवण्यासह अनेक विकास कामे आणि समाज उपयोगी उपक्रम यशस्वीरित्या राबविले जात आहेत.