सध्या वेड्यासारखा कोसळतो आहे पाऊस. सगळीकडे आहेच पण बेळगावचा पाऊस फारच भन्नाट असतो बरं का. आमच्या बेळगावला रिटायर्ड लोकांचे गाव, गरिबांचे महाबळेश्वर, गुलाबी थंडीचं गाव असं काय काय म्हणतात.
मी कोल्हापूरची, कोल्हापूर म्हणजे रसरसणारं गाव तर बेळगाव म्हणजे थंड निवांत गाव… गाव कारण अजूनही जुन्या पद्धतीची सुंदर घरं, इमारती पहायला मिळतात. लग्न झालं तेंव्हा पहिल्यांदा मला कससंच वाटायचं. म्हणजे पहा हं… त्याकाळी म्हणजे साधारण छत्तीस वर्षांखाली इथे लाईट रोज जायचे, तेही दोन चार तास सहज. लाईट गेले तरी सगळे आरामात असायचे, मी खवळायची, अरे! फोन तरी करा, लाईट गेलेत म्हणून. पण छे! येतील अग, असं उत्तर असायचं… एकूणच निवांतपणा… नंतर हे कोडं उलगडलं. हवा थंड असल्यानं असेल वागण्यात थंडपणा असं वाटलं. पण युरोपात बर्फात सुद्धा कित्ती काम करतात लोकं. मग लक्षात आलं, हा निवांतपणा हवेतच आहे इथल्या. म्हणून ‘रिटायर्ड लोकांचे गाव’ म्हणत असावेत.
इथं खुद्द बेळगावात कोल्हापूर सारख्या खूप जागा नाहीत हं फिरायला, बघायला. पण आजूबाजूला इतका सुंदर निसर्ग आहे की काय त्याचे नाव! साधारण 30,35 किलोमीटरवर चिक्कार अप्रतिम ठिकाणं आहेत. इतकी छान की तुम्ही बेळगावच्या प्रेमात पडायलाच हवं.
माझी आर्टिस्ट मैत्रीण, प्रीतीला पावसात भटकायला आणि भिजायला खूप आवडतं. मला फक्त भटकायला, बेळगावच्या पावसात भिजलं की थंडी भरते, त्यामुळे मी भिजत नाही फारशी. काल जाऊ म्हणून निघालो. निघालो म्हणजे कुठं जायचं हे न ठरवताच गाडी सुरू केली. कावळेसाद जरा लांब म्हणून जांबोटी रस्त्याला जाऊ असं ठरवलं. व्हिटीयु सोडलं की वाटेत गर्द जंगल लागतं. आधी पाऊस नव्हता पण जसजसे जंगलात आत आत शिरलो, धुंवाधार पाऊस सुरू झाला. इतका की दहा फुटांपलीकडे काहीच दिसेना. मग काय! एकदम संथ गतीत मस्त गाणी ऐकत निघालो. मग ठरलं कणकुंबीच्या देवीला जाऊ…
कणकुंबी! गोव्याला जाताना चोर्ला घाटात साधारण चाळीस किलोमीटर अंतरावर आहे. तिथे माऊली देवीचं एक सुंदर देऊळ आहे. देवळाच्या बाहेर पाण्याचं एक कुंड आहे. नेहमी त्यात उतरता येतं पण पावसाळ्यात ते पूर्ण भरलेलं असतं. शांत, नयनरम्य परिसर. जांभ्या दगडाचं बांधकाम. देखणी आहे देवी. आत खांबांवर वेगवेगळ्या मूर्ती आहेत. अत्यंत सुंदर देखण्या. देवळात विजेचे दिवे नव्हते. एक समई लावलेली आणि त्या प्रकाशात ती लोभसवाणी देवी. दर्शन घेऊन बसल्यावर उठूच नये वाटत होतं. बाहेर झिम्माड पाऊस आणि मधूनच डोकावणारा सूर्य. म्हणजे छत्री उघडावी की नाही या संभ्रमात पडावं. गोव्याची जीवनदायी म्हादयी आणि मलप्रभाचा उगम इथून होतो असं गुगल सांगतो. पण पाऊस इतका जास्त होता की दर्शन घेऊन लगेच परत निघालो. यावेळी धबधबा बघायचा राहणार याचं वाईट वाटत होतं.
येताना जेवायला म्हणून रेड हिल्स रिसॉर्टमध्ये गेलो. मागे दोन चार वेळा गेले होते तिथे, पण पावसाळ्यात नव्हते. प्रीतीला म्हणलं, चल, तुला एक छोटू धबधबा दाखवते. कारण अगदी चिंचोळा छोटा धबधबा पाहिला होता तिथं. जेवण झाल्यावर घसरड्या पायवाटेने निघालो धबधबा पहायला. घसरताना भीती वाटत होती तसं हसायला ही येत होतं. आणि पोचलो तर काय!! लाल पाण्याचा दणदणून कोसळणारा धबधबा पहायला मिळाला. येताना जोरात पाऊस आला. माझी न भिजण्यासाठी धावपळ झाली पण कुठलं काय! भिजून निथळत होतो… त्याक्षणी भाजलेल्या भुट्ट्याची आणि गरमागरम कॉफीची आठवण झाली. अर्थात गाडीत थर्मास मध्ये वाफळती कॉफी होतीच. आहाहा… एकूणच कालचा दिवस कायम लक्षात राहील…
म्हणूनच म्हणते… बेळगावचा पाऊस असाच आहे… भन्नाट, रोमँटिक आणि जादुई…
चिंब चिंब भिजवणारा…
©वृषाली मराठे.(लेखिका) बेळगाव
16/07/2022