बेळगाव स्मार्ट सिटी लिमिटेड योजनेंतर्गत फसवणूक करणाऱ्या कंत्राटदारावर कारवाई केली जावी या मागणीसह स्मार्ट सिटी योजनेमध्ये होत असलेल्या भ्रष्टाचाराच्या निषेधार्थ आम आदमी पार्टीतर्फे आज बुधवारी सकाळी बेळगाव स्मार्ट सिटी लिमिटेड कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन छेडून निदर्शने करण्यात आली.
अपात्र अनुभव नसलेल्या सहाय्यक अभियंत्यांच्या नेमणूका करून पात्र अभियंत्यांना डावलणे, स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत निकृष्ट दर्जाच्या रस्त्यांचे बांधकाम, सीबीटी बसस्थानकाच्या नूतनीकरणाचे कंत्राट मिळालेल्या कंत्राटदराकडून कलामंदिर येथील प्रकल्पामध्ये झालेली फसवणूक तसेच बेळगाव स्मार्ट सिटी योजनेमध्ये होत असलेला भ्रष्टाचार याच्या निषेधार्थ आम आदमी पार्टीचे उत्तर वलय प्रभारी राजकुमार टोपण्णावर यांच्या नेतृत्वाखाली आज बेळगाव स्मार्ट सिटी लिमिटेड कार्यालय समोर तीव्र आंदोलन छेडण्यात आले.
या संदर्भात प्रसारमाध्यमांशी बोलताना राजकुमार टोपण्णावर यांनी बेळगाव स्मार्ट सिटी लिमिटेड योजनेतील भ्रष्टाचार आता जगजाहीर झाला असल्याचे सांगून अपात्र लोकांच्या नेमणुका करून विकास कामे राबविण्यात आल्यामुळे त्यांचा बोजवारा उडाला आहे. स्मार्ट सिटी योजनेसाठी अनुभव नसलेल्या अपात्र सहाय्यक अभियंत्यांच्या नेमणुका करण्यात आल्या आहेत. ज्यामुळे कंत्राटदाराचे फावले असून पैसे घेऊन मोकळ्या झालेल्या या कंत्राटदाराने अर्धवट किंवा निकृष्ट दर्जाची कामे केली आहेत. स्मार्ट सिटीच्या सिमेंट रस्ते, ड्रेनेज आदी विकास कामांसाठी 600 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. तयार करण्यात आलेल्या रस्त्यांची 20 वर्षाची हमी देण्यात आली असली तरी अवघ्या वर्षभरात पहिल्या पावसातच हे रस्ते खराब झाले आहेत. पेव्हर्सच्या रस्त्यांचे कामही निकृष्ट दर्जाचे करण्यात आले असून ठीकठिकाणी पेव्हर्स उखडत आहेत. एकीकडे निकृष्ट दर्जाची विकास कामे आणि दुसरीकडे अपात्र लोकांची नेमणूक असा स्मार्ट सिटीचा कारभार सुरू आहे.
सीबीटी बस स्थानकाचे कंत्राट मिळालेल्या कंत्राटदाराने कलामंदिर प्रकल्पासाठी ऑनलाइन निविदा भरताना खोटी कागदपत्रे दाखल करून सरकारची फसवणूक केली आहे. याप्रकरणी संबंधित कंत्राटदारावर कारवाई करावी अशी मागणी करून देखील गेल्या 2 वर्षापासून त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. खरे तर असा फसवणुकीचा प्रकार उघडकीस आल्यास संबंधित कंत्राटदाराकडून त्याच्या हातातील सध्याचे काम काढून घेऊन ते दुसऱ्या चांगल्या कंत्राटदाराला द्यावे असे कायदा सांगतो. मात्र बेळगाव स्मार्ट सिटी लिमिटेड करून अद्याप कोणतीच कारवाई झालेली नाही. संबंधित कंत्राटदारावर कारवाई करण्यासाठी आता आम्ही आठवड्याभराची मुदत दिली आहे जर या कालावधीत कारवाई झाली नाही तर आम्ही पुन्हा आंदोलन छेडू, असे टोपण्णावर म्हणाले.
स्मार्ट सिटी योजनेतील भ्रष्टाचाराबद्दल बोलताना अधिकारी, कंत्राटदार आणि संबंधित राजकारणी यांच्या संगनमताने स्मार्ट सिटीचा निधी हडप केला जात असल्याचा आरोप त्यांनी केला. सदर भ्रष्टाचाराच्या चौकशीची मागणी केल्यानंतर केयुआयएफसी या नोडल एजन्सीने बेळगाव स्मार्ट सिटी लिमिटेडला पत्र पाठवून स्पष्टीकरण मागितले आहे. तथापि चार-पाच वेळा पत्रे पाठवून देखील स्मार्ट सिटीकडून कोणतेच उत्तर देण्यात आलेले नाही असे सांगून बेळगाव स्मार्ट सिटी योजनेतील भ्रष्टाचारास सत्ताधारी पक्षाचे आमदारच जबाबदार आहेत असे म्हणण्यास बराच वाव असल्याचेही राजकुमार टोपण्णावर यांनी स्पष्ट केले.
स्मार्ट सिटी लिमिटेड कार्यालयासमोर छेडण्यात आलेल्या आंदोलनात टोपण्णावर यांच्यासह आपचे नेते शंकर हेगडे, शिवानंद कारी, पाशा सय्यद, गंगाधर हुब्बेळप्पनवर, एम के सय्यद समीर निहाल जुनेद गिरीश आदींसह बऱ्याच कार्यकर्त्यांचा सहभाग होता.