येत्या 21 जून रोजीचा आंतरराष्ट्रीय योग दिन आणि आजादी का अमृत महोत्सव यानिमित्त शहरातील योगपटू संजीव हंचिनमणी हे 25 तास पाण्यावर तरंगण्याचा थरारक उपक्रम राबविणार आहेत. योगपटू हंचिनमणी हे 20 जून रोजी सायंकाळी 4:30 ते 21 जून सायंकाळी 5:30 वाजेपर्यंतच्या कालावधीत आपला हा उपक्रम करतील.
काहेर -केएलई अकॅडमी ऑफ हायर एज्युकेशन अँड रीसर्च, स्विमर्स क्लब बेळगाव आणि ॲक्वेरियस स्विमिंग क्लब बेळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने केएलई सुवर्ण जेएनएमसी जलतरण तलावात हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. योगपटू संजीव हंचिनमणी हे आपल्या 25 तास पाण्यावर तरंगण्याच्या उपक्रमा दरम्यान दर 4 तासांनी नैसर्गिक विधी आणि न्यूट्रिशनसाठी 10 मिनिटांची विश्रांती घेतील.
त्याचप्रमाणे 24 अन्य जलतरणपटू प्रत्येकी 1 तास याप्रमाणे एका पाठोपाठ एक हंचिनमणी यांना प्रोत्साहन आणि पाठिंबा देण्यासाठी पाण्यावर तरंगणार आहेत. त्याच प्रमाणे अन्य 25 वेगवेगळ्या वयोगटाचे जलतरणपटू तंदुरुस्तीचे प्रतीक म्हणून प्रत्येकी 1 तास याप्रमाणे एकानंतर एक असे जलतरण करतील.
याव्यतिरिक्त कांही राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय दर्जाचे दिव्यांग जलतरणपटू देखील या उपक्रमात सहभागी होणार आहेत. एकंदर संजीव हंचिनमणी यांना प्रोत्साहन व पाठिंबा देण्यासाठी एकूण 75 जलतरणपटुंचा या उपक्रमात सहभाग असणार आहे.
आंतरराष्ट्रीय योग दिन आणि आजादी का अमृत महोत्सवानिमित्त हा उपक्रम राबविला जाणार आहे. उपक्रमाची सांगता मंगळवारी 21 जून रोजी सायंकाळी दिमाखदार सोहळ्याने होणार आहे. तरी जलतरणासह क्रीडाप्रेमींनी या थरारक उपक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहून प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे