भटक्या कुटुंबातील एकवर्षीय प्रवीण सोळंखे हा बालक किडनी आजाराने त्रस्त असून फेसबुक फ्रेंड्स सर्कलच्या माध्यमातून मदतीचा ओघ सुरूच असून प्रविणच्या शस्त्रक्रियेसाठी यश हॉस्पिटलने मोफत शस्त्रक्रियेसाठी पुढाकार घेऊन यश हॉस्पिटलचे डॉ. एस.के.पाटील व डॉ. संगीता एस.पाटील व सर्जन विजय पूजार,डॉ.बी.एस.कोडलीवालीमठ व हुसेन मगदुमसाब यांनी प्रविणची परिस्थिती पाहून माणुसकीच्या दृष्टीकोनातून यशस्वीरीत्या शस्त्रक्रिया केली.
प्रविणचे कुटुंब हे मूळचे मानेवाडी तालुका मंगळवेढा जिल्हा सोलापूर येथील भटक्या विमुक्त जातीतील असून पोटाची खळगी भरण्यासाठी सीमा भागातील गावांमध्ये साईबाबा,स्वामी समर्थ अशा देवदेवतांच्या पालख्या घेऊन गावोगावी फिरत असतात व त्यातून मिळणाऱ्या तुटपुंज्या मदतीतून ते आपल्या जीवनाचा रहाटगाडा चालवीत असतात.सध्या त्यांचा मुक्काम शिवम नगर जवळील माळरानावर असून त्यातील सोळंखे कुटुंबातील प्रवीण नावाचा एक वर्षीय बालक हा किडनी आजाराने त्रस्त आहे.
नवऱ्याने व्यसनापायी प्रवीण व त्याच्या आईला सोडून दिले असून सद्या त्यांचा सांभाळ आजी आजोबा करीत आहेत. प्रविणच्या उपचारासाठी आई,आजी यांनी आपल्या अंगावर असलेलं थोडंफार सोनं विकून आतापर्यंत त्याच्यावर उपचार केले आहेत पण दिवसेंदिवस वाढत जाणारा उपचाराचा खर्च कुटुंबाच्या आवाक्याबाहेर असल्याने सोळंखे कुटुंब हतबल झाले होते.
याची माहिती फेसबुक फ्रेंड्स सर्कलच्या संतोष दरेकर,प्रशांत बिर्जे आणि राहुल देशपांडे यांना समजताच त्यांनी अवधूत तुडवेकर,संतोष देशपांडे, पूनम मोहन कुमार,सतीश पाटील,समीर कुलकर्णी,सम्राट पाटील,संतोष गावडे ,जॅमयांग व्यंगल, श्रवण रामगूरवाडी, हरीश, श्री.रमाकांत कोंडुस्कर,भारत नागरोळी यांच्या सहकार्याने या कुटूंबाला आर्थिक मदत त्याचबरोबर अन्नधान्य उपलब्ध करून दिले आहे.
यावेळी डॉ शिवानंद मास्तीहोळी तालुका हेल्थ ऑफिसर यांनी बाळाचे ऑपरेशन यशस्वी झाल्या बद्दल डॉ. विजय पुजार व यश हॉस्पीटलं चे प्रमुख डॉ.एस.के . पाटील यांचं अभिनंदन व कौतुक केले .प्रविणच्या उपचारासाठी समाजातील सर्वांनी शक्य ती मदत केल्याबद्दल फेसबुक फ्रेंड्सचे अध्यक्ष संतोष दरेकर व सतीश पाटील यांनी आभार मानले .