बेळगाव आणि गोव्याला जोडणाऱ्या चोर्ला घाटातील रस्त्यावर उन्मळून पडलेला मोठा वृक्ष प्रवाशांनीच श्रमदानाने बाजूला हटवून वाहतूक सुरळीत केल्याची घटना आज रविवारी दुपारी घडली.
चोर्ला घाटामध्ये आज सकाळी रस्त्या शेजारील एक मोठा वृक्ष अचानक उन्मळून रस्त्यावर कोसळला. परिणामी बेळगाव -गोवा मार्गावरील वाहतूक कांही तास पूर्णपणे ठप्प होऊन घाटामध्ये मोठी वाहतूक कोंडी झाली होती. घाटातील रस्त्याच्या दोन्ही बाजूला वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या.
कोसळलेला वृक्ष पाहण्यासाठी प्रवाशांची मोठी गर्दी केली होती. वाहतूक कोंडीमुळे अडकून पडलेल्या प्रवाशांना होणारा मनस्ताप आणि वृक्ष हटविण्यासाठी सरकारी मदत मिळण्यास लागणार विलंब लक्षात घेऊन अखेर उपस्थित प्रवाशांनीच वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी पुढाकार घेतला.
कर्नाटक -गोवा असा आंतरराज्य प्रवास करणाऱ्या या प्रवाशांनी रस्त्यावर कोसळलेला वृक्ष हटविण्यासाठी कोणत्याही मनुष्यनिर्मित साहित्याचा वापर न करता सरकारी यंत्रणेला लाजवेल असे कार्य केले. रस्त्यावर कोसळला मोठा वृक्ष सहजासहजी हटवणे शक्य नसल्याचे लक्षात येताच जमलेल्या प्रवाशीवर्गातील जाणकार मंडळींनी शक्कल लढवली.
आपल्या पूर्वजांचे अनुकरण करताना या प्रवाशांनी कोसळलेल्या झाडाच्या मजबूत फांद्यांचा पहारी सारखा वापर करताना एक दोन तीन.. हैय्या! असे म्हणत ताकद लावून कोसळलेला वृक्ष सरकवत, सरकवत मोठ्या खुबीने रस्त्यावरून हटविला.
यामुळे रस्त्यावर कोसळलेला वृक्ष हटविण्यासाठी कांही कालावधी लागला असला तरी त्यानंतर चोर्ला घाटातील वाहतूक सुरळीत झाल्यामुळे सर्वांमध्ये समाधान व्यक्त होण्याबरोबरच वृक्ष हटविणाऱ्या त्या प्रवाशांचे कौतुक होत होते.