सोसाट्याच्या वाऱ्यासह पडलेल्या पावसामुळे एक मोठा वृक्ष रस्त्यावर उन्मळून पडल्याची घटना काल रात्री 8 च्या सुमारास बेळगाव -वेंगुर्ला रस्त्यावर घडली. यामुळे कांही काळ वाहतूक ठप्प झाली होती. मात्र कॅन्टोन्मेंट बोर्डाचे माजी उपाध्यक्ष साजिद शेख आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी मदतीला धावून जात कोसळलेले झाड रस्त्यावरून हटविले.
काल रात्री जोरदार वाऱ्यासह पडलेल्या पावसामुळे बेळगाव -वेंगुर्ला रस्त्यावरील श्री गणपती मंदिराशेजारी एक मोठा वृक्ष रस्त्यावर उन्मळून पडला. रात्री 8 च्या सुमारास घडलेल्या या घटनेमुळे विजेच्या मुख्य तारांचे नुकसान झाले. याखेरीज सदर मार्गावरील वाहतूक कांही काळ ठप्प झाली होती.
रस्त्यावर कोसळलेला वृक्ष तातडीने बाजूला करणे गरजेचे असल्यामुळे त्यासंदर्भात रहदारी पोलीस निरीक्षक मंजुनाथ नायक यांनी कॅन्टोन्मेंट बोर्डाचे माजी उपाध्यक्ष आणि धडाडीचे सामाजिक कार्यकर्ते साजिद शेख यांच्याशी संपर्क साधला आणि रस्ता मोकळा करण्यासाठी मदत करण्याची विनंती केली. तेंव्हा साजिद शेख यांनी आपल्या कांही मित्रांसह त्वरेने घटनास्थळी दाखल होऊन स्वतः आपल्याकडील दणकट कटरच्या सहाय्याने त्या वृक्षाच्या फांद्या वगैरे तोडून वृक्ष रस्त्यावरून हटविताना रस्ता वाहतुकीस खुला करून दिला.
या मदतीबद्दल पोलीस अधिकारी आणि वृक्षांमुळे रस्त्यावर खोळंबून पडलेल्या वाहनचालकांनी साजिद शेख यांना धन्यवाद दिले. कॅम्प परिसरात एखादा वृक्ष कोसळला आणि त्यासाठी कोणी मदतीची विनंती केली तर साजिद शेख नेहमी हातातील कामे सोडून संबंधितांच्या मदतीला धावून जात असतात.
शेख यांनी यापूर्वी सामाजिक कार्य म्हणून स्वतःहून श्रमदानाने कॅम्प परिसरातील रस्त्यावर कोसळलेले बरेच वृक्ष आपल्याकडील कटरने तोडून वाहतूक सुरळीत करण्यास मदत केली आहे.