गौंडवाड (ता. जि. बेळगाव) येथील सतीश पाटील या तरुणाच्या खून प्रकरणी काकती पोलिसांनी आणखी तिघा संशयित महिलांना अटक केली आहे. त्यामुळे या खून प्रकरणातील आरोपींची संख्या आता 10 झाली आहे.
अटक करण्यात आलेल्या तिघा संशयित महिलांची नावे लक्ष्मी वेंकटेश कुट्रे (वय 24), संगिता संजय कुट्रे (वय 45) आणि शशिकला उर्फ अनिता आनंद कुट्रे (तिघीही रा. भैरवनाथ गल्ली, गौंडवाड) अशी आहेत.
गौंडवाड गावातील भैरवनाथ मंदिरासमोर कारगाडी पार्क केल्याच्या कारणावरून शनिवारी रात्री सतीश पाटील या तरुणाचा चाकूने भोसकून खून करण्यात आला होता.
त्यानंतर गावात दंगल उसळून 11 हून अधिक वाहनांची जाळपोळ करण्याबरोबरच घरांची तोडफोड करण्यात आली होती. गवत गंजींना आगी लावण्यात आल्या होत्या. त्यामुळे प्रचंड तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. याप्रकरणी काकती पोलीस ठाण्यात खून व जाळपोळ प्रकरणी दोन वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले.
खुनाच्या घटनेनंतर पोलिसांनी आनंद रामा कुट्रे (वय 60), जायाप्पा ऊर्फ बाळू भैरू निलजकर (वय 52), सुरेखा जायाप्पा ऊर्फ बाळू निलजकर (वय 47), संजना जायाप्पा उर्फ बाळू निलजकर (वय 21), व्यंकट उर्फ व्यंकटेश वैजू कुट्रे (वय 50), दौलत सिद्धाप्पा मुतगेकर (वय 29) आणि लखन जायाप्पा ऊर्फ बाळू निलजकर (वय 25, सर्व रा गौंडवाड) अशा सात जणांना अटक करून त्याची कारागृहात रवानगी केली होती. त्यानंतर काल मंगळवारी आणखी तिघा संशयित महिलांना अटक करण्यात आली आहे.