महाराष्ट्र एकीकरण समितीमुळेच सीमाभागात मराठी भाषा टिकून आहे. आता आपले हक्क डावलणार्या कर्नाटकी प्रशासन आणि सरकारला जाब विचारण्याची वेळ आली. 27 जूनच्या विराट मोर्चाची जनजागृती झाली असली तरी, प्रत्येक कार्यकर्त्याने आपापल्या गावात मोर्चाची जागृती करावी आणि विराट मोर्चात मराठी माणसांची ताकद दाखवून द्यावी, असे आवाहन तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या बैठकीत करण्यात आले.
मराठी कागदपत्रांच्या 27 जून रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात येणार्या विराट मोर्चाबाबत विचार विनिमय करण्यासाठी तालुका समितीची बैठक सोमवारी (दि. 20) तुकाराम महाराज सांस्कृतिक भवनात झाली. अध्यक्षस्थानी अॅड. राजाभाऊ पाटील होते.
यावेळी तालुका समिती युवा आघाडी अध्यक्ष संतोष मंडलिक म्हणाले, मराठी माणसांना आमिषे दाखवून फिरवण्याचा प्रयत्न होतोय. आता मराठी माणूस गप्प बसणार नाही. आमच्या हक्कांसाठी आम्हाला रस्त्यावर उतरल्याशिवाय पर्याय नाही. कोणतेही राजकारणी स्वत:च्या पैशांनी लोकांना रोजगार देत नाहीत. आमच्याच पैशांवर राजकारण करण्याचा प्रयत्न करत आहे. महिला वर्गाला फिरवण्याचा प्रयत्न करत आहेत. पण, असे प्रकार करणार्यांना मराठी जनता धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. विराट मोर्चासाठी सर्वांनी एकवटावे.
माजी जिल्हा पंचायत सदस्या सरस्वती पाटील म्हणाल्या, मराठीचा दु:स्वास करण्यासाठी कर्नाटक सरकार आणि प्रशासन कानडीकरणाचा वरवंटा फिरवत आहे. मराठी भाषा जगली तरच मराठी माणूस शिल्लक राहणार. त्यामुळे या अस्तित्वाच्या लढ्यात सर्वांनी सहभागी व्हावे. 27 जूनचा विराट मोर्चा यशस्वी करून आपली ताकद दाखवूया.
यावेळी अॅड. राजाभाऊ पाटील, एस. एल. चौगुले, अॅड. एम. जी. पाटील, अॅड. सुधीर चव्हाण, डॉ. राजगोळकर, माणिक होनगेकर, रामचंद्र मोदगेकर, विनायक पाटील, बी. एस. होनगेकर आदींनी मनोगत व्यक्त केले.
आर. आय. पाटील, एपीएमसी माजी अध्यक्ष निंगाप्पा जाधव, माजी सदस्य आर. के. पाटील, ईश्वर गुरव, राजू किणयेकर, किरण मोटणकर, दत्ता जाधव, कृष्णा हुंदरे, सुनील अष्टेकर, नानू पाटील, बी. डी. मोहनगेकर, चेतन पाटील आदी उपस्थित होते