बेळगाव महापालिकेच्या वतीने रस्त्याच्या डिव्हायडर च्या मध्ये बसवण्यात आलेल्या पथदीपाच्या सुटुन पडलेल्या विद्युत भारित तारेत करंट आल्याने एकाचा जीव सुदैवानं बचावल्याची घटना शनिवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास घडली आहे.
शनिवारी सायंकाळी सिव्हिल हॉस्पिटल रोडवरील यु के 27 हॉटेल जवळ सदर विद्युत भारीत तार बाहेर पडल्याने हा अनर्थ टळला आहे.
सदर घटना घडताच तात्काळ पोलिसांच्या निदर्शनाला आणून देण्यात आली त्यानंतर लागलीच घटनास्थळी हेस्कॉमचे कर्मचारी दाखल झाले आणि रस्त्यावर पडलेल्या त्या विद्युत संपर्क तारेला बाजूला केले. यावेळी हेस्कॉम कर्मचाऱ्यांनी घटनास्थळावरील विद्युतभारित तारांची तपासणी केली असता त्या तारेमधून करंट वाहत होते हे निदर्शनास आले त्यामुळे तेथे उपस्थित अनेक लोकांनी सुटकेचा निश्वास घेतला.
गेल्या 20 नोव्हेंबर रोजी शिवबसव नगर मध्ये अशीच एक घटना घडली होती अन करंट लागून डॉ राजू नाईक यांचा कुत्र्याला जीव गमवावा लागला होता आणि डॉ नायक मात्र या घटनेतून सुदैवाने बचावले होते.
बेळगाव महापालिकेच्या वतीने दुभाजकाच्या मधोमध मध्ये पथदीप बसवलेले आहेत त्याची देखभाल करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या दुर्लक्षित पणामुळे अशा घटना घडत आहेत. रस्त्याच्या मध्ये पथदीप बसवण्यात आलेले आहेत त्या पथदीप मधल्या जंक्शन मधून विद्युतभारित तारा बाहेर पडत आहेत याकडे लक्ष देण्याची गरज आहे.
शहरात एखादी घटना घडली की वरिष्ठ अधिकारी कर्मचाऱ्यांना सक्त ताकीद देतात काही दिवसापुरता कर्मचारी सतर्क असतात मग काही दिवसांनी पुन्हा येरे माझ्या मागल्याच असे सुरू होते. त्यामुळे आगामी पावसाळ्यामध्ये पथदीप असोत किंवा विद्युत पुरवठा करणाऱ्या सुटलेल्या तारा याकडे महापालिका असो हेस्कॉम या सर्व प्रशासनाच्या यंत्रणांनी लक्ष देणे गरजेचे आहे.