कोणी कितीही प्रयत्न केले तरी विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदार संघातील निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांचा विजय निश्चित आहे, असा ठाम विश्वास माजी मंत्री व कागवाडचे विद्यमान आमदार श्रीमंत पाटील यांनी व्यक्त केला.
वायव्य शिक्षक आणि पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीसाठी कागवाड येथील सरकारी कन्नड शाळेतील मतदान केंद्रात आज सोमवारी सकाळी आपला मतदानाचा हक्क बजावल्यानंतर ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्याचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई उत्तम प्रशासन लाभले आहे. शिक्षक व पदवीधर मतदार संघातील भाजपचे प्रभुत्व आणि निवडणुकीतील सरळ, सज्जन कार्यक्षम अशा आमच्या दोन्ही उमेदवारांना मिळालेला प्रचंड पाठिंबा पाहता आमचा विजय निश्चित आहे, असे आमदार श्रीमंत पाटील म्हणाले.
कागवाड येथील मतदान केंद्रामध्ये आज आमदार श्रीमंत पाटील, त्यांचे सुपुत्र श्रीनिवास पाटील, योगेश पाटील, सुशांत पाटील आदींसह त्यांच्या समर्थकांनी मतदानाचा हक्क बजावला.
आज सकाळपासून कागवाड आणि उगार येथील मतदान केंद्रांमध्ये काँग्रेस आणि भाजपची नेतेमंडळी आपल्या समर्थकांसह मतदानासाठी येत असल्याचे चित्र पहावयास मिळत होते. त्याप्रमाणे नेतेमंडळींनी मतदारांसाठी चहा आणि नाश्त्याची सोय केल्याचे दिसून येत होते.