भारतीय वायुसेनेचे आंतरराष्ट्रीय तायक्वांडो प्रशिक्षक श्रीपाद रवी राव आणि बेळगाव जिल्हा तायक्वांदो असोसिएशनच्या संयुक्त विद्यमाने राव युवा अकॅडमी मार्फत मुलींसाठी आयोजित ‘किक अँड शौट’ ही स्व-संरक्षण कार्यशाळा आज शनिवारी यशस्वीरित्या उत्साहात पार पडली.
काकती येथील सरकारी कन्नड व उर्दू माध्यम शाळेमध्ये आयोजित या कार्यशाळेत सहभागी मुलींना आपत्कालीन स्थितीत स्वतःचे शील व प्राण वाचवण्यासाठी उपयुक्त तंत्र, तसेच शारीरिक व मानसिक तंदुरुस्तीसाठी आवश्यक व्यायामाचे प्रशिक्षण देण्यात आले. तायक्वांडोच्या नियमित अभ्यासामुळे आत्मविश्वास कसा वाढतो हे समजवण्यात आले.
याप्रसंगी बोलताना कन्नड सरकारी शाळेचे मुख्याध्यापक बी. एन. मडीवाळर यांनी आजच्या समाजात मुलींनी सशक्त होण्याबरोबरच स्व-संरक्षणाचे तंत्र आत्मसात करणे अत्यावश्यक आहे असे सांगितले.
शाळेचे शारीरिक शिक्षक विजय राजमनी यांनी तायक्वांडोचा सराव हा स्व-संरक्षणा सोबत क्रीडा क्षेत्रात यश प्राप्त करण्यासाठीही उपयुक्त असल्याचे मत व्यक्त केले. कार्यक्रमास सरकारी उर्दू शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती एस. के. नाईक आणि सर्व शिक्षक वृंद उपस्थित होता.
‘किक अँड शौट’ कार्यशाळेत काकती सरकारी कन्नड माध्यमिक शाळा व सरकारी उर्दु माध्यमिक शाळेतील 11 वर्षावरील वयाच्या 115 विद्यार्थिनींचा सहभाग होता. या सर्व मुलींना तायक्वांदो मास्टर श्रीपाद आर. राव यांचे हस्ते प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. तायक्वांडो राष्ट्रीय पंच स्वप्नील राजाराम पाटील आणि वैभव राजेश पाटील यांनी कार्यशाळेचे सहप्रशिक्षक म्हणून काम पाहिले. कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी जितेश सतीश पुजारी, त्रिवेणी भडकांनावर, श्रेया मारुती अतिवाडकर व श्रीराज राजेश पाटील यांनी विशेष परिश्रम घेतले.