विधान परिषदेच्या वायव्य शिक्षक आणि पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीसाठी जिल्ह्यात अतिशय उत्साहाने मतदान होत असून यावेळी शिक्षक मतदार संघातील उमेदवार प्रकाश हुक्केरी हेच निश्चितपणे विजय होतील, असा विश्वास केपीसीसी कार्याध्यक्ष आमदार सतीश जारकीहोळी यांनी व्यक्त केला आहे.
गोकाक येथील सरकारी पदवीपूर्व महाविद्यालयाच्या ठिकाणी सुरू असलेल्या मतदानाप्रसंगी आमदार सतीश जारकीहोळी प्रसारमाध्यमांशी बोलत होते. तीन जिल्ह्यांमध्ये पदवीधर मतदारांची संख्या जास्त आहे. त्यामुळे पदवीधर मतदार संघातील उमेदवाराच्या विजयासाठी बरेच परिश्रम घ्यावे लागले. तथापि आमच्या कार्यकर्त्यांनी तीनही जिल्ह्यांमध्ये अतिशय उत्साहाने प्रचाराचे कार्य केले आहे. यावेळी काँग्रेस उमेदवारांचा विजय निश्चित आहे, असे आमदार जारकीहोळी म्हणाले.
प्रकाश हुक्केरी एसएसएलसी फेल आहेत, त्यांच्याकडून आता कामं होणार नाहीत असे प्रभाकर कोरे म्हणाले आहेत याबद्दल विचारणा केली असता. भाजपच्या उमेश कत्ती आणि लक्ष्मण सवदी यांना जनतेने सर्टिफिकेट दिले आहे.
त्याचप्रमाणे प्रकाश हुक्केरी हे गेल्या 30 वर्षापासून जनतेची सेवा करत आहेत. यासाठी त्यांच्या मतदार संघातील जनतेने त्यांना उत्तम कार्य करणारा नेता म्हणून सर्टिफिकेट दिले आहे. समाजसेवा करण्यासाठी कोणत्याही पदवीची गरज नाही. प्रकाश हुक्केरी यांनी विविधांगाने अनेक विकास कामे करून सार्वजनिकांचे जीवन सुसह्य केले आहे. कायद्याने सर्वांना निवडणूक लढविण्याचे अधिकार दिले आहेत. हुक्केरी म्हातारे झाले आहेत, त्यांचे वय झाले आहे असा हास्यास्पद आरोप भाजप वारंवार करत आहे.
वयाचा आणि काम करण्याचा कोणताही संबंध नाही असे सांगून या निवडणुकीमध्ये प्रकाश हुक्केरी हेच बहुमताने निवडून येतील असा आमचा विश्वास आहे, असे आमदार सतीश जारकीहोळी यांनी स्पष्ट केले. याप्रसंगी काँग्रेस नेते अशोक पुजारी, शंकर गिड्डनावर, सिद्धलिंग दळवाई, अशोक पाटील, विवेक जत्ती आदी उपस्थित होते.