सिग्नल पडल्यामुळे टिळकवाडी येथील दुसऱ्या रेल्वे गेटच्या ठिकाणी थांबलेल्या एका मालवाहू रेल्वे गाडीच्या दोन डब्यांमधील जागेतून चक्क रेल्वे खालून शालेय विद्यार्थी धोकादायकरित्या रूळ ओलांडताना आज सकाळी पहावयास मिळाले. हा जीवघेणा प्रकार पाहून अनेकांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली. तसेच शिक्षक व पालकांनी याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज व्यक्त केली.
बेळगाव येथून खानापूरच्या दिशेने जाणाऱ्या रेल्वे मार्गाचे दुपदरीकरण करण्यात आल्यापासून टिळकवाडी येथील पहिल्या व दुसऱ्या रेल्वे गेटच्या ठिकाणी रेल्वे गाडी थांबून राहण्याचे प्रकार अलीकडे वाढले आहेत. यामुळे वाहतुकीचा खोळंबा तर होतच आहे, शिवाय धोकादायकरित्या रेल्वेगाडीला ओलांडून जाण्याचे प्रकार वाढले आहेत.
कांही दिवसापूर्वी सिग्नल पडल्यामुळे पहिल्या रेल्वे गेटच्या ठिकाणी एक पॅसेंजर रेल्वे बराच काळ थांबून राहिली होती. त्यावेळी बऱ्याच लोकांनी थेट थांबलेल्या रेल्वे डब्याच्या एका दरवाजाने चढून दुसऱ्या दरवाजाने उतरत रेल्वे रूळ ओलांडला. असाच धोकादायक किंबहुना यापेक्षाही अधिक धोकादायक जीवाशी खेळण्याचा प्रकार आज शनिवारी सकाळी दुसऱ्या रेल्वे गेटच्या ठिकाणी पहावयास मिळाला.
दुसऱ्या रेल्वे गेट येथे आज सकाळी एक मालवाहू रेल्वेगाडी सिग्नल पडल्यामुळे थांबून राहिली होती. त्यावेळी रेल्वे वाघिणी अर्थात डबे ज्या ठिकाणी जोडलेले असतात, त्या अरुंद वाटेतून चक्क रेल्वे खालून शालेय मुलामुली ये -जा करताना पहावयास मिळाली. खेदाची बाब ही की एक पालक या मुलांना त्यासाठी मदत करताना दिसत होते.
मुले रेल्वे खालून ये -जा करत असताना सुदैवाने अचानक रेल्वे सुरू झाली नाही अन्यथा अनर्थ घडण्याची शक्यता नाकारता येत नव्हती. सदर धोकादायक प्रकारामुळे गेट पडल्याने रस्त्याच्या दोन्ही बाजूला थांबलेल्या वाहनचालकांमध्ये तीव्र नापसंती व्यक्त होण्याबरोबरच शिक्षक व पालकांनी आपल्या मुलांना समज देण्याची गरज व्यक्त केली जात होती.