कथानक सृजन प्रक्रिया कमालीची गुढ आणि लेखकालाही अज्ञात असते. त्यामुळे साहित्यकृतीचा जन्म चमत्कारी, गुढ, अज्ञात अवस्थेत होत असतो, असे विचार प्रा. विनोद गायकवाड यांनी व्यक्त केले.
राणी चन्नम्मा विद्यापीठातील रिडर्स फोरम अर्थात वाचक मंचच्यावतीने आयोजित ‘मी कादंबऱ्या कशा लिहितो’ या विषयावरील आपल्या व्याख्यानाप्रसंगी प्रा. गायकवाड बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वाचक मंचचे अध्यक्ष आणि समाजकार्य विभागाचे प्रमुख प्रा. डॉ. अशोक डिसोजा होते. आपल्या व्याख्यानात प्रा. विनोद गायकवाड म्हणाले की, कथाबीज सजणे, लेखन सुचणे, कथानक आकाराला येणे वगैरे अनेक निर्मिती प्रक्रियेतील गोष्टी जाणिवेमध्ये घडत असतात.
सृजन प्रक्रिया ही कमालीची गुढ व खुद्द लेखकालाही अज्ञात असते. जमिनीखालून वाहणाऱ्या एखाद्या झऱ्याप्रमाणे प्रतिभेचा स्त्रोत अंतराळातून वाहत असतो त्यावर साहित्य सृजनाचे पीक येते साहित्यकृतीचा जन्म असा चमत्कारी गुढ अज्ञात अवस्थेत होत असतो असे सांगून सृजन व्यवहार तसा अनाकालीन असतो, असे प्रा. गायकवाड यांनी सांगितले.
‘युगांत’ आणि ‘साई’ या कादंबऱ्यांविषयी विवेचन करताना ते म्हणाले, युगांतसाठी महाभारताचा सात वर्षे अभ्यास केला आणि लेखन सहा महिन्यात पूर्ण केले. महाभारतातील सुष्ट-दुष्ट कोणतीही व्यक्ती असो विशिष्ट तत्त्व घेऊन उभी राहिल्याचे दिसते. तत्वांचा विलक्षण संघर्ष त्यात पाहायला मिळतो. साई साठीही विविध संदर्भ ग्रंथ अभ्यासावे लागले. ही अध्यात्मिक गुढ अशी व्यक्तिरेखा आहे. सर्व धर्मांमध्ये पूल बांधण्याचे कार्य साई तत्त्वज्ञान करते.
प्रारंभी प्रा. अशोक डिसोजा यांनी प्रास्ताविक, स्वागत आणि वक्त्यांचा सन्मान केला. प्रा. डॉ. देवता गस्ती यांनी सर्वांचे आभार मानले. सदर व्याख्यानाचा कार्यक्रम एकाच वेळी ऑफलाईन आणि ऑनलाईन होता. मुख्य भाषणानंतर प्रश्नोत्तराचा दिलखुलास कार्यक्रम झाला. विद्यापीठातील प्राध्यापक आणि संशोधक विद्यार्थी याप्रसंगी मोठ्या संख्येने उपस्थित होते.