आधीच बंद असलेल्या कपिलेश्वर रेल्वे गेटच्या म्हणजे फाटकाच्या ठिकाणी पादचाऱ्यांना ये-जा करण्यासाठी खुली ठेवण्यात आलेली जागा आता सिमेंटचे पिलर घालून बंद करण्यात आल्यामुळे समस्या निर्माण झाली असून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.
कपलेश्वर रेल्वे फाटक येथे उड्डाणपूल झाल्यानंतर तेथील गेट बंद करण्यात आले आहे. तथापि स्थानिक नागरिकांच्या मागणीवरून रेल्वे फाटकच्या ठिकाणी नागरिक विशेष करून वयोवृद्ध नागरिक आणि लहान मुलांना घेऊन ये -जा करता यावी यासाठी एकावेळी दोघेजण जाऊ शकतील इतकी जागा रेल्वे गेटच्या दोन्ही बाजूला खुली ठेवण्यात आली होती.
त्यामुळे रेल्वेमार्गाच्या दुतर्फा राहणाऱ्या रहिवाशांना कामानिमित्त दुसऱ्या बाजूला जावयाचे असल्यास उड्डाणपुलाचा अवलंब करण्याऐवजी रेल्वे फाटकातून चालत रेल्वे लाईन ओलांडून ये -जा करणे सुलभ जात होते.
आता आज सकाळपासून या रेल्वे फाटकाच्या ठिकाणी पायी ये-जा करण्यासाठी खुली ठेवण्यात आलेली एका बाजूची जागा सिमेंटचे पिलर घालून बंद करण्यात आली आहे. परिणामी रेल्वेमार्ग ओलांडून पलीकडे जाण्याचा रस्ता बंद झाल्यामुळे नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. विशेष करून या भागातील वयोवृद्ध नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
या खुल्या जागेमुळे शाळकरी मुले अल्पावधीत फाटक ओलांडून शाळेला ये-जा करत होती. मात्र आता ते बंद होणार असून या मुलांसह सर्वांनाच उड्डाणपूल अथवा अन्य पर्यायी मार्गाने पलीकडे जावे लागणार आहे. यामुळे सर्वत्र नापसंती व्यक्त केली जात असून कपलेश्वर रेल्वे फाटकाच्या ठिकाणी ये -जा करण्यासाठी असलेली जागा पूर्ववत खुली करावी, अशी जोरदार मागणी केली जात आहे.