बेळगाव जिल्ह्यातील मुडलगी येथे 7 मृत मानवी भृण आढळल्याच्या घटनेमुळे जिल्हा प्रशासनासह आरोग्य खाते खडबडून जागे झाले असून जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशावरून जिल्ह्यातील सर्व स्कॅनिंग सेंटरवर वैद्य अधिकार्यांच्या पथकाने धाडी टाकून कागदपत्रांची तपासणी सुरू केली आहे.
बेळगाव जिल्ह्यातील मुडलगी येथे 7 भ्रूणांची हत्या केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. त्यामुळे खडबडून जागे झालेल्या जिल्हा प्रशासन व आरोग्य खात्याने सदर घटनेची गांभीर्याने दखल घेतली आहे.
त्या अनुषंगाने जिल्हाधिकाऱ्यांनी बेळगाव शहरासह जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील सर्व स्कॅनिंग सेंटरची तपासणी करण्याचा आदेश दिला आहे. त्या आदेशाची अंमलबजावणी करताना वैद्य अधिकाऱ्यांच्या पथकांनी तालुक्यातील सर्व स्कॅनिंग सेंटरवर धाडी टाकून आवश्यक कागदपत्रांची तपासणी सुरू केली आहे.
बेळगाव शहरातून या मोहिमेचा प्रारंभ करण्यात आला असून तालुका वैद्याधिकाऱ्यांच्या पथकाने आज शहरातील स्कॅनिंग सेंटर्सना भेटी देऊन कागदपत्रांची तपासणी करत सखोल चौकशी सुरू केली आहे.
बेळगाव तालुक्याचे वैद्याधिकारी शिवानंद मास्तीहोळी यांच्या नेतृत्वाखालील पथकाने प्रारंभी पट्टणशेट्टी स्कॅनिंग सेंटरला भेटी देऊन कागदपत्रांची तपासणी केली. याप्रसंगी वैद्य अधिकाऱ्यांचे परवाना प्रमाणपत्र (दाखला), स्कॅनिंग मशीन लायसन्स, स्त्रीलिंग भ्रूण तपासण्या आदिम संदर्भात कागदपत्र तपासणी करून माहिती गोळा केली. वैद्याधिकाऱ्यांच्या या धाडसत्रामुळे स्कॅनिंग सेन्टर चालकांमध्ये मात्र खळबळ उडाली आहे.