बेळगाव : संत बसवेश्वर यांच्यासंदर्भात पाठयपुस्तकात चुकीची माहिती देण्यात आली असून हि माहिती त्वरित हटविण्यात यावी, यासाठी जागतिक लिंगायत महासभा, राष्ट्रीय बसवसेनेच्या वतीने बेळगावमध्ये निदर्शने करण्यात आली. या संघटनांच्यावतीने जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून निवेदन देण्यात आले.
पाठयपुस्तक समितीवरून कर्नाटकात सध्या जोरदार वाद सुरु आहे. याचदरम्यान इयत्ता नववीच्या पाठ्यपुस्तकात संत बसवेश्वर यांच्यासंदर्भात चुकीची माहिती समाविष्ट करण्यात आल्यावरून आणखी एक नवा वाद सुरु झाला.
विश्वगुरू संत बसवेश्वर महाराजांसंदर्भात आक्षेपार्ह माहिती पाठयपुस्तकात समाविष्ट करण्यात आली असून यावरून लिंगायत समाजात संताप व्यक्त करण्यात येत आहे. सदर आक्षेपार्ह मजकूर हटविण्यात यावा, या मागणीसाठी गुरुवारी बेळगावमध्ये लिंगायत महासभा आणि राष्ट्रीय बसवसेनेच्या वतीने निदर्शने करण्यात आली.
याप्रकारासंदर्भात प्रसारमाध्यमांना माहिती देताना लिंगायत महासभेचे जिल्हाध्यक्ष बसवराज रोट्टी म्हणाले, नववीच्या पाठयपुस्तकात बसवण्णा यांच्याविषयी आक्षेपार्ह आणि दिशाभूल करणारी माहिती देण्यात आली आहे. उपनयन विधी संदर्भात देण्यात आलेली माहिती हि अत्यंत चुकीची असून पाठयपुस्तक मंडळाने हि गंभीर चूक केली आहे. बसवेश्वर हे लिंगायत धर्मसंस्थापक होते. त्यांनी वीरशैव पंथाचा विकास केला हि माहिती खोटी आहे, असे रोट्टी म्हणाले.
यावेळी आंदोलकांनी निवेदन सादर करून एक आठवड्याच्या आत ही चुकीची माहिती न हटविल्यास उग्र आंदोलन छेडण्याचा इशारा निदर्शकांनी दिला. या निदर्शनामध्ये शंकर गुडस, अरविंदा पारशेट्टी, ए. वाय. बेंडीगेरी, एस. जी. सिदनाळ, बी. एस. सुलतानपुरी, सतीश चौगला आदींनी भाग घेतला.