नुपूर शर्मा यांच्या ‘त्या’ वादग्रस्त वक्तव्याचे समर्थन श्रीराम सेनेचे अध्यक्ष प्रमोद मुतालिक यांनी केले असून शर्मांना भाजपमधून निलंबित करण्याच्या कारवाईचा निषेध केला आहे. तसेच भाजपने दबावाला बळी पडून सत्याला दाबण्याचा प्रयत्न केला आहे. शर्मांवरील कारवाई हा भाजपने केलेला एक गुन्हाच आहे असे सांगून भाजप प्रवक्त्या नुपुर शर्मा यांच्यावरील निलंबनाची कारवाई रद्द करावी, अशी मागणी मुतालिक यांनी केली आहे.
बेळगाव शहरामध्ये आज शुक्रवारी आयोजित पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते. एक पक्षाच्या प्रवक्त्या म्हणून नूपुर शर्मा यांनी विरोधी पक्षाला जशास तशी समर्पक उत्तरे दिली आहेत. त्या आपल्या पक्षाची भूमिका मांडत होत्या. त्याच्यावर निलंबनाची कारवाई करणे योग्य नसून हा एक प्रकारे अन्याय आहे असं मला भाजपला सांगायचा आहे, असे प्रमोद मुतालिक म्हणाले. कतार, सौदी अरेबिया, इराक यासह अनेक अरबी देशांनी त्याला विरोध केला आहे. मुस्लीम राष्ट्रांच्या दबावाला भीक घालण्याची गरज नाही. तसे असेल तर हिंदू धर्मग्रंथ, हिंदू देव-देवतांबद्दल अश्लील बोलणाऱ्यांवर आम्ही कोणती कारवाई करावी? असा प्रतिप्रश्न त्यांनी यावेळी केला. एम. एफ. हुसेन यांनी देवतांचा अपमान केला होता. तेंव्हा तुम्ही कुठे गेला होता? बांगलादेश आणि पाकिस्तानमध्ये राहणाऱ्या हिंदू अल्पसंख्यांकांवर अत्याचार होतात. त्यावर ‘त्या’ इस्लामिक राष्ट्रांचा मत काय? तेंव्हा ते कुठे जातात? पाकिस्तानमध्ये आज केवळ 12 लाख हिंदू शिल्लक आहेत. 1947 साली ही संख्या 12 कोटी होती आज ती केवळ 12 लाख आहे, यावर कोण काय बोलत नाही. यावर मुस्लिम राष्ट्रांची भूमिका काय? मुस्लिम राष्ट्रांना घाबरण्याची कोणतीही गरज नाही. त्यांच्या दबावाखाली येऊन कारवाई करण्याची गरज नाही. त्यांना भीक घालता कामा नये. नुपूर शर्मा यांना आमचा पाठिंबा आहे, असे मुतालिक यांनी स्पष्ट केले
बेळगावात भररस्त्यात फाशी दिलेल्या अवस्थेत नुपूर शर्मा यांची प्रतिकृती लटकविण्याच्या प्रकाराचा त्यांनी तीव्र शब्दात निषेध केला. इतक्या उंचावर प्रतिकृती टांगणे ये पाच -दहा मिनिटाचे काम नाही त्याला कांही तास लागले असतील. तेंव्हा तेथील आसपासचे सीसीटीव्ही कॅमेरे तपासले जावेत असे सांगून ती प्रतिमा लटकणाऱ्यांचा शोध का घेतला जात नाही? पोलीस प्रशासन यासंदर्भात अद्याप गप्प का? असा सवालही प्रमोद मुतालिक यांनी केला. काश्मीरमध्ये 32 वर्षांनंतर पुन्हा हिंदूंवरील अन्यायाची पुनरावृत्ती होत आहे. जाणून बुजून हिंदूना शोधून त्यांच्या हल्ले केले जात आहेत अशा मुस्लिमांवर कारवाई केली जावी अशी मागणी करून काश्मीरमधील घटनांना केंद्र सरकार जबाबदार असल्याचा आरोप त्यांनी केला. त्याचप्रमाणे काश्मिरी पंडितांना केंद्र सरकारने सुरक्षा पुरवावी, अशी मागणी त्यांनी केली.
राज्य पाठ्यपुस्तक समितीचे अध्यक्ष रोहित चक्रतीर्थ यांची हाकलपट्टी करून सरकारने चूक केली असून आमचा रोहित चक्रतीर्थ यांना पाठिंबा आहे असे मत प्रमोद मुतालिक यांनी व्यक्त केले. 1947 पासून आतापर्यंत केंद्रीय शिक्षण मंत्री व जबाबदाऱ्यांमध्ये पाच जण मुस्लिम होते हेच देशाचे दुर्दैव आहे, असेही ते म्हणाले.