विधान परिषदेच्या वायव्य पदवीधर आणि शिक्षक मतदार संघाची निवडणुक शांततेत सुरळीत पार पडावी यासाठी व्यापक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला असल्याची माहिती बेळगावची पोलीस आयुक्त डाॅ. एम. बी. बोरलिंगय्या यांनी दिली.
विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बेळगाव शहरातील पोलीस बंदोबस्ताची माहिती देताना पोलीस आयुक्त डॉ बोरलिंगय्या म्हणाले, निवडणूक बंदोबस्त संदर्भात बेळगाव शहरात विशेष खबरदारी घेण्यात आली असून व्यापक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
बेळगाव पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्रात सर्वत्र चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. मस्टरिंग आणि डी मस्टरिंगचे काम झाल्यानंतर बेळगावातच मतमोजणी होणार असल्याने त्या दृष्टिकोनातून विशेष काळजी घेतली जाणार आहे. मतपेट्या असणाऱ्या स्ट्रॉंग रूम परिसरात कडक पोलिस बंदोबस्त असणार आहे.
यावेळी इतर जिल्ह्यातील मतपेट्या बेळगावात आणल्या जाणार असल्याने त्यासंदर्भात बोलताना पोलीस आयुक्तांनी इतर जिल्ह्यातील पोलीस प्रशासनाशी समन्वय साधून मतपेट्या कडेकोट पोलीस बंदोबस्तात एस्कॉर्टने बेळगावात आणल्या जातील, असे सांगितले.
याखेरीज मतमोजणीसाठी येणारे अधिकारी आणि वृत्त संकलनासाठी येणाऱ्या पत्रकारांची व्यवस्थेसह काउंटिंग टेबल्सचीही व्यवस्था केली जात आहे. यावेळी वाहन पार्किंगची व्यवस्था सीपीएड मैदानावर करण्यात आली आहे. याबरोबरच निवडणूक कर्मचाऱ्यांच्या भोजनाचीही व्यवस्था केली जाईल, तसेही पोलीस आयुक्त डॉ. एम. बी बोरलिंगय्या यांनी स्पष्ट केले.