तंबाखू सेवनाचे व्यसनाधीनता कमी करण्याच्या उद्देशाने तंबाखू विक्रीवरही नियंत्रण ठेवण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. यापुढे प्रत्येक पानपट्टीवर तंबाखू उपलब्ध होणार नसून त्याच्या विक्रीसाठी व्यवसाय परवाना घेणे आवश्यक ठरणार आहे.
हॉटेल आणि इतर व्यवसायाला व्यापार परवाना दिला जातो. त्याचप्रमाणे तंबाखू विक्रीसाठी देखील या पुढे विक्री परवाना देण्याचा विचार सुरू आहे. राज्यात गुटखा बंदीचा कायदा करण्यात आला असला तरी पानमसाला मिळाल्याने त्यात तंबाखूचे मिश्रण करून सेवन केले जाऊ लागले आहे.
परिणामी गुटखाबंदीचा परिणाम जाणवला नाही. पानपट्टी चालक हवे त्या ठिकाणी पानपट्टी दुकान सुरू करून गुटखा, तंबाखू, सिगारेट, बिडी यांची विक्री करत असल्याने आता व्यापार परवान्याची सक्ती केली जाणार आहे.
तंबाखू विक्री परवाना देताना त्यासंबंधीचे नियम देखील कठोर केले जाणार आहेत. त्यानुसार तंबाखू विक्री केली जाणाऱ्या दुकानाचा आकार व त्या ठिकाणी होणारा तंबाखूचा साठा निश्चित केला जाणार आहे.
सीसीटीव्ही कॅमेरा बसवणे आणि 18 वर्षाखालील मुलांना तंबाखू विक्री केल्यास व्यवसाय परवाना रद्द करण्याचा नियम नियमावलीत समाविष्ट असणार आहे.