गिंडे कॉलनी, नानावाडी येथील ‘एमराल्ड’ असे नामकरण असलेल्या एका अपार्टमेंटमधील रस्त्यावरून वाहणाऱ्या दुर्गंधीयुक्त सांडपाण्याचा स्थानिक नागरिकांना प्रचंड त्रास होत असून लोकप्रतिनिधींसह संबंधित अधिकाऱ्यांनी याकडे तात्काळ लक्ष देण्याची मागणी केली जात आहे.
गिंडे कॉलनी, नानावाडी येथे ‘एमराल्ड’ असे नांव असलेल्या निवासी संकुल अर्थात अपार्टमेंटची उभारणी करणाऱ्या बिल्डरने म्हणजे बांधकाम व्यवसायिकाने तेथील ड्रेनेज व्यवस्था दर्जेदार केलेली नाही. परिणामी अलीकडच्या काळात सदर या अपार्टमेंटमधील सांडपाणी मोठ्या प्रमाणात रस्त्यावरून वाहत आहे असा आरोप स्थानिकांनी केला आहे.
या समस्येमुळे आसपासच्या अपार्टमेंट आणि घरांमधील नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत असून त्यांना घराबाहेर पडणे मुश्कील झाले आहे. दररोज दुर्गंधीयुक्त सांडपाण्यातून ये-जा करावी लागत असल्यामुळे येथील नागरिक त्रस्त झाले आहेत. यासंदर्भात वारंवार तक्रार करून देखील संबंधित बिल्डर त्याकडे दुर्लक्ष करत आहे असेही तेथील नागरिकांचे म्हणणे आहे.
रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहणाऱ्या व साचलेल्या सांडपाण्यामुळे दुर्गंधी तर पसरली आहे, शिवाय अस्वच्छता निर्माण होऊन डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. परिणामी परिसरातील नागरिकांच्या विशेष करून वृद्ध व्यक्ती व लहान मुलांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे.
त्याचप्रमाणे ‘एमराल्ड’ नामक त्या अपार्टमेंटमधील मोठ्या प्रमाणात आसपास पसरणारे सांडपाणी जमिनीत झिरपून परिसरातील विहिरींचे पाणी दूषित होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तरी लोकप्रतिनिधी आणि संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे गांभीर्याने लक्ष देऊन तात्काळ कार्यवाही करावी, अशी जोरदार मागणी केली जात आहे.