बेळगाव जिल्ह्यातील मुडलगी गावात ओढ्याकाठी 7 मानवी मृत भ्रूण आढळून येण्याच्या खळबळजनक घटनेप्रकरणी जिल्हा आरोग्य खाते आणि पोलिसांनी स्थानिक वेंकटेश्वर मॅटर्निटी हॉस्पिटल अँड स्कॅनिंग सेंटरवर धाड टाकून ते सील करण्याद्वारे तपास कार्य हाती घेतले आहे.
जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. महेश कोणी यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार गर्भपातानंतरचे हे मृत मानवी भृण 3 वर्षांपूर्वीचे असून जे बरण्यांमध्ये संरक्षित करून ठेवण्यात आले होते.
व्यवस्थित विल्हेवाट लावण्यासाठी हॉस्पिटल कर्मचाऱ्यांच्या हातात सुपूर्द केलेल्या मृत भ्रूणं असलेल्या पाच बरण्या शुक्रवारी नागरिकांना गावातील नाल्याकाठी आढळून आल्या. मृत भ्रूणं असलेल्या बरण्या गेल्या गुरुवारी 23 जून रोजी नाल्यात फेकण्यात आल्या होत्या, ज्या काल शुक्रवारी गावकऱ्यांच्या निदर्शनास आल्या.
दरम्यान, याप्रकरणी आज जवळपास सहा हॉस्पिटल्स आणि स्कॅनिंग सेंटरवर धाडी टाकून तपासणी करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे प्लास्टिक बरण्यांमध्ये सापडलेले सातही भ्रूणं न्यायवैद्यक विज्ञान प्रयोग शाळेत (फॉरेन्सिक सायन्स लॅबरोटरी) पाठवण्यात आले असून त्यांच्या अहवालाची प्रतीक्षा आहे.
प्रथमदर्शनी हे प्रकरण बेकायदेशीर गर्भलिंग परीक्षेचे वाटत असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.सर्व सातही भ्रूण मुडलगी येथील वेंकटेश्वर हॉस्पिटलचे आहेत अशी कबुली या इस्पितळाने दिली आहे.कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे ते नदी काठी फेकण्यात आल्याची माहिती तपासात उघड झाली आहे.
दरम्यान मुडलगी येथील संशयास्पद स्कॅनिंग सेंटर ला धाडी मारुन सीज करण्यात आलेले आहे. जिल्हा आरोग्य खात्याच्या डोळ्यात धूळफेक करून सर्वांच्या डोळ्यादेखत गर्भपात करण्याचे प्रकरण असल्याचे या प्रकरणावरून उघडकीस आले आहे.