वायव्य कर्नाटक पदवीधर आणि शिक्षक मतदार संघाच्या विधान परिषद निवडणुकीच्या मतमोजणीला बुधवारी सकाळी बेळगाव येथील ज्योती पीयुसी कॉलेजमध्ये सुरुवात झाली आहे.
प्रादेशिक आयुक्त अमलान बिश्वास, निवडणूक निरिक्षक मन्नीवन्नन, बेळगाव चे जिल्हाधिकारी नितेश पाटील यांच्या सह विजापूर बागलकोटचे डी सी, पोलिंग एजंट यांच्या उपस्थितीत स्ट्राँग रूम उघडण्यात आला आणि मतमोजणीला सुरुवात झाली आहे.
शिक्षक मतदारसंघात प्रकाश हुक्केरी विरुद्ध अरुण शहापूर तर पदवीधर मतदारसंघात हनुमंत निराणी विरुद्ध सुनील अशी लढत झाली आहे. राजकीय अभ्यासकानी वर्तवलेल्या अंदाजात शिक्षक मतदारसंघात काँग्रेसचे प्रकाश हुक्केरी तर पदवीधर मतदारसंघात भाजपचे हनुमंत निराणी यांचे पारडे जड मानले जात आहे.
ज्योती कॉलेजमध्ये मतमोजणीला सुरुवात झाली असून दुपारी बारापर्यंत निकाल येण्याची शक्यता आहे बेळगाव जिल्ह्यात वायव्य पदवीधर मतदारसंघासाठी 67.80% तर शिक्षक विधान परिषदेसाठी 86.72 टक्के मतदान झाले आहे.
बेळगाव जिल्ह्यात पदवीधर मतदार संघात एकूण झालेल्या 30595 मतात 21088 पुरुष तर 8707 महिला पदवीधरानी मतदान केले आहे.वायव्य शिक्षक विधान परिषदेत बेळगाव जिल्ह्यात 86.72 टक्के मतदान झाले त्यात 7547 पुरुष 3974 महिला शिक्षकांनी अश्या 11521 शिक्षकांनी मतदान केले होते.
बेळगाव विजापूर आणि बागलकोट अश्या तिन्ही जिल्ह्यांचा मिळून वायव्य कर्नाटक पदवीधर आणि शिक्षक मतदार संघ आहे. बेळगाव जिल्ह्या व्यतिरिक्त एकूण मतदान पदवीधर मतदारसंघात एकूण 99598 पैकी 65814 मतदारांनी मतदान केलंय तर शिक्षक मतदारसंघात 25386 पैकी 21401 शिक्षकांनी मतदान केलं आहे.
सुरुवातीला मतमोजणी मध्ये वैध-अवैध मतं वेगळी केली जाणार असून पंचवीस मतांचा गठ्ठा केला जाणार आहे आणि त्यानंतरच मतमोजणीला खऱ्या अर्थाने सुरुवात होणार आहे दुपारी बारानंतर निकाल समोर येण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. होणाऱ्या विजय उमेदवारासाठी मतांचा कोटा देखील निश्चित केला असून जो उमेदवार कोटा रिच करेल त्याला विजयी घोषित केले जाणार आहे.