पोलीस प्रशासनाकडून समितीचा मोर्चा निष्प्रभ व्हावा यासाठी दडपशाही केली जात असली तरी मराठी भाषेचा प्रशासकीय कामकाजात अंतर्भाव व्हावा, सरकारी परिपत्रके मराठी भाषेत मिळावीत, या मागणीसाठी -न्याय हक्कासाठी ठरल्याप्रमाणे मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेतृत्वाखाली सोमवार दि. 27 जून रोजी भव्य मोर्चा काढला जाईल. त्यामध्ये कोणताही प्रकारचा बदल केला जाणार नाही. तेंव्हा हा मोर्चा शांततेत यशस्वी करण्यासाठी मराठी भाषिकांनी मोठ्या संख्येने मोर्चात सामील व्हावे, असे आवाहन मध्यवर्ती म. ए. समितीचे सरचिटणीस माजी महापौर मालोजीराव अष्टेकर यांनी केले आहे.
मोर्चा बाबतची माहिती जाणून घेण्यासाठी काल शुक्रवारी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे पदाधिकारी, प्रमुख कार्यकर्ते व पोलीस अधिकाऱ्यांची बैठक काल शुक्रवारी पोलीस आयुक्तालयात पार पडली. त्या अनुषंगाने मालोजीराव अष्टेकर बेळगाव लाईव्हशी बोलत होते.
बेळगावसह सीमाभागातील भाषिक अल्पसंख्यांक मराठी जनतेला त्यांच्या मातृभाषेत म्हणजे मराठीत सरकारी कागदपत्रे -परिपत्रके मिळावीत या मागणीसंदर्भात गेल्या एक 1 रोजी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन लवकरात लवकर कार्यवाही करण्याची विनंती करण्यात आली होती. अन्यथा 27 जून रोजी मोर्चा काढण्यात येईल असा इशाराही देण्यात आला होता. मोर्चाचे यशस्वी आयोजन करण्यासाठी मध्यवर्ती म. ए. समितीने गेले कांही दिवस मोठे प्रचार कार्य हाती घेतले असून समितीचे कार्यकर्ते मोर्चा यशस्वी करण्याच्या दृष्टीने प्रयत्नशील आहेत. या परिस्थितीत समितीच्या नेतेमंडळींना पोलीस खात्यावतीने काल पोलीस आयुक्तालयात बोलावून घेऊन हा मोर्चा छोटा काढा, मोर्चाने न येता फक्त निवेदन द्या, अशा प्रकारची विनंती करण्यात आली.
या बैठकीत पोलीस प्रशासनाने जवळजवळ दबावतंत्र अवलंबले होते. तुमचे कार्यकर्ते सोशल मीडियावर वेगवेगळ्या पोस्ट टाकून समाजात गोंधळ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत, अशी थातूरमातूर कारणे सांगून नियोजित मोर्चा कशाप्रकारे निष्प्रभ होईल यासाठी प्रयत्न केले गेले.
मात्र हजर असलेल्या म. ए. समितीच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी एकमुखाने 27 तारखेचा मोर्चा यशस्वी करण्याचा निर्धार व्यक्त केला. तेंव्हा येत्या 27 जून रोजी सकाळी 11 वाजता धर्मवीर संभाजी चौक येथून निघणारा मोर्चा कॉलेज रोड मार्गे जिल्हाधिकार्यालयवर जाईल.
आमची मागणी आणि मोर्चा संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांशी देखील बैठक झाली आहे. त्यांना आम्ही मराठी भाषिकांच्या सर्व व्यथा सांगितल्या आहेत. कर्नाटक सरकारकडून आलेले पत्र, केंद्र सरकारकडून आलेले पत्र अशी सर्व कागदपत्र आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना दिली आहेत. मात्र अद्यापही प्रशासनाकडून कोणतीच कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे आम्ही हा मोर्चा कोणत्याही परिस्थितीत काढून मराठी माणसांच्या व्यथा पुन्हा मांडणार आहोत.
तेंव्हा सर्व मराठी भाषिकांनी या मोर्चात मोठ्या संख्येने सामील होऊन अत्यंत शांततेने हा मोर्चा पार पडण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन करून सरचिटणीस मालोजीराव अष्टेकर यांनी समिती कार्यकर्ते निश्चित प्रमाणे प्रचंड संख्येने मोर्चात सहभागी होतील असा आम्हाला विश्वास आहे, असेही सांगितले.