मराठी आमचा श्वास आहे मराठी आमचा ध्यास आहे मराठी टिकलीच पाहिजे यासाठी आमचा अट्टहास आहे.आम्ही सीमावासीय सगळे जण मराठी आईची लेकरं आहोत यासाठी आपण 27 तारखेला रस्त्यावर उतरणार आहोत ते आपल्या आईच्या सन्मानासाठी..असे मत तालुका महाराष्ट्र एकीकरण समिती युवा आघाडीचे अध्यक्ष संतोष मंडलिक यांनी व्यक्त केले.
गुरुवारी बेळगाव तालुक्यातील किणये विभाग म ए समितीच्या वतीनं बहाद्दरवाडी येथे 27 रोजी होणाऱ्या मोर्चाच्या जनजागृतीसाठी बैठकीला संबोधित करताना बोलत होते.
मराठी ही जगात मोठ्या संख्येने बोलली जाणारी भाषा आहे मराठी टिकावी यासाठी आम्ही सगळे प्रयत्नशील आहोत. बेळगावातील मराठी पण टिकवण्यासाठी आम्ही सगळ्यानी प्रयत्न करणे गरजेचे आहे असे सांगत बेळगाव प्रशासनाला ताकत दाखवून देऊया मराठी परिपत्रक मिळवूया असा विश्वास व्यक्त केला.
मध्यवर्ती म ए समितीचे अध्यक्ष दीपक दळवी,माजी आमदार मनोहर किणेकर,प्रकाश मरगाळे, वकील सुधीर चव्हाण,वकील एम जी पाटील, जेष्ठ समिती नेते नानू पाटील,विकास कलघटगी ,ग्राम पंचायत सदस्य आदी उपस्थित होते.
मराठीच्या आग्रहासाठी काढण्यात येणाऱ्या या मोर्चासाठी जनजागृती म्हणून गावोगावी बैठका घेण्यात येत आहेत.मोर्चात शेकडोच्या संख्येने सहभागी होऊ असा निर्धार बहाद्दरवाडी ग्रामस्थांनी केला.