‘मार्कंडेय साखर कारखान्याच्या ऊस गाळपाला यंदा नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात सुरुवात करण्यात येणार असून यंदा किमान 3 लाख 50 हजार मेट्रिक टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट आहे, अशी माहिती कारखान्याचे अध्यक्ष अविनाश पोतदार यांनी दिली.
ऊस उत्पादक शेतकरी आणि मार्कंडेय साखर कारखान्याचे ऊस पुरवठा व्यवस्थापन यांची विशेष बैठक कारखाना कार्यस्थळी काल मंगळवारी खेळीमेळीत पार पडली. याप्रसंगी अध्यक्षस्थानावरून अविनाश पोतदार बोलत होते. व्यासपीठावर कारखान्याचे संचालक मनोहर हुक्केरीकर, अनिल कुट्रे, बसवराज घाडगे, भाऊराव पाटील, परशराम कोलकार, मनोहर होनगेकर, सद्याप्पा राजकट्टी, लक्ष्मण नाईक, नीलिमा पावशे व वसुधा म्हाळोजी हे उपस्थित होते. ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी बेळगाव तालुक्यात एकमेव मार्कंडेय साखर कारखाना आहे. कारखान्याला ऊस पाठविणे, ऊस तोडणी टोळी, वाहतुक पुरवठा यासाठी शेतकऱ्यांनी पुढाकार घेतल्यास शेतकऱ्यांच्या समृद्धी बरोबरच कारखान्याची प्रगती देखील होणार आहे, असे पोतदार पुढे म्हणाले.
मार्कंडेय कारखान्याने पहिल्या वर्षी ट्रायलला 71 हजार मेट्रिक टन, दुसऱ्या वर्षी 120 हजार मेट्रिक टन तर गेल्या वर्षी 195 हजार मेट्रिक टन उसाचे गाळप केले आहे. यंदा नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात ऊस गाळपाला सुरुवात करून किमान 3 लाख 50 हजार मेट्रिक टन ऊस गाळप करण्याचे उद्दिष्ट आहे.
ऊस पुरवठा केलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यावर 48 कोटी रुपये जमा करण्यात आले असून 2 कोटी रुपये येत्या पंधरवड्यात जमा केले जाणार आहेत, असेही अध्यक्ष अविनाश पोतदार यांनी स्पष्ट केले. यावेळी मनोहर हुक्केरीकर यांनीही समयोचित विचार व्यक्त केले.
बैठकीस काकती, होनगा, केदनूर, देवगिरी, सांबरा, हिरेबागेवाडी, उचगाव, कडोली आदी गावातील शेतकरी बहुसंख्येने उपस्थित होते. संचालक अनिल कुट्रे यांनी उसाच्या रिकव्हरीनुसार ऊस तोडणी करणार असल्याचे सांगून सर्वांचे आभार मानले.