Wednesday, December 25, 2024

/

महिला विद्यालय शाळेचे प्रभाताई देशपांडे स्कूल असे नामकरण संपन्न*

 belgaum

“जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर त्यासाठी तुमच्या मनाची एकाग्रता, धाडस आणि आत्मविश्वास या गोष्टी महत्त्वाच्या आहेतच पण त्याबरोबरच तुम्हाला नैतिक मूल्यांची सुद्धा गरज आहे. या प्रभाताई देशपांडे यांच्या महिला विद्यालय शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांवर त्यांच्या बालपणीच नैतिक मूल्याची बिजे पेरणी गेली असल्याने या शाळेचा एकही विद्यार्थी जीवनात वाया जाणार नाही असा माझा विश्वास आहे” असे विचार कोल्हापूरच्या रामकृष्ण मिशन आश्रमाचे स्वामी बुद्धानंदजी यांनी बोलताना व्यक्त केले .

बेळगाव येथील महिला विद्यालय मंडळाच्या इंग्रजी माध्यम शाळेचे नामकरण शाळेसाठी आपली हयात खर्ची केलेल्या ‘प्रभाताई देशपांडे इंग्रजी माध्यम शाळा’असे करण्याचा कार्यक्रम शनिवारी संपन्न झाला. त्याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेल्या स्वामी बुद्धानंदजी यांनी अतिशय मौलिक विचार व्यक्त केले.

‘प्रभाताई देशपांडे या महान शिक्षिका होत्या असा त्यांचा उल्लेख करून ते पुढे म्हणाले की “एखादा विद्यार्थी अतिशय हुशार, कष्टकरी असला तरीसुद्धा त्याच्या मनावर नैतिक मूल्ये बिंबवणेची गरज आहे आणि वेगवेगळ्या कथानकातून नैतिक मूल्यांचे महत्व समजावून सांगण्याची गरज आहे त्याशिवाय त्याला ते समजनार नाही. महिला विद्यालयाने सुरुवातीपासूनच हे कार्य केले आहे त्यामुळे त्यांचे नाव शाळेला देण्याचा एक अतिशय स्तुत्य उपक्रम संचालक मंडळाने पार पडला आहे “असे ते म्हणाले .स्वामी विवेकानंदांच्या जीवनातील अनेक प्रसंग त्यांनी यावेळी सांगितले.

गोगटे रंगमंदिराच्या सभागृहात संपन्न झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष भगवानदास कपाडिया हे होते. कार्यक्रमाची सुरुवात विद्यार्थिनींच्या रामरक्षा आणि स्वागत गीताने झाली. पुष्पांजली नंतर प्राचार्या कविता यांनी उपस्थितांचे स्वागत केले प्रभाताईंच्या फोटोचे पूजन करण्यात आल्यानंतर भव्य अशा समईचे दिपप्रज्वलन माजी शिक्षक व पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले. पाहुण्यांचा सन्मान अध्यक्षांच्या हस्ते करण्यात आला .संस्थेचे चिटणीस ऍड विवेक कुलकर्णी यांनी संस्थेच्या गेल्या पन्नास वर्षातील कार्याचा आढावा घेतला आणि ज्या प्रभाताई देशपांडे यांनी या शाळेची सुरुवात करून आपली हयात या शाळेसाठी खर्ची घातली त्यांचे नाव शाळेला देण्याचा निर्णय संचालक मंडळाने घेतला तोही आज प्रभाताई यांचा 91 वा वाढदिवस आहे त्यानिमित्ताने “असे सांगून त्यांनी संस्थेचा सुवर्ण महोत्सव 23 व 24 डिसेंबर रोजी भव्य प्रमाणात साजरा केला जाणार आहे असे सांगितले. त्यानंतर महिला विद्यालय मंडळाचे प्रभाताई देशपांडे इंग्रजी माध्यम शाळा असे नामकरण करण्याच्या फलकाचे अनावरण स्वामीजींच्या हस्ते करण्यात आले. टाळ्यांच्या गजरात, पेढे वाटप करून आणि फटाके वाजवून हा आनंद साजरा करण्यात आला.

Mahila vidhyalay renamed
याप्रसंगी बोलताना उद्योजक रोहित देशपांडे म्हणाले की, प्रभाताई या माझ्या आत्या असल्या तरी आम्ही तिला प्रभा मावशी म्हणत होतो. तिच्या नेकीने केलेल्या कार्यामुळेच ही संस्था पुढे आली आणि तिचे स्वप्न संचालक मंडळने पूर्ण केले असे ते म्हणाले याप्रसंगी काही माजी विद्यार्थ्यांचीही भाषणे झाली अतिशय सद्गदीत होऊन विद्यार्थ्यांनी शाळेबद्दल आणि प्रभाताई बद्दल आपल्या भावना व्यक्त केल्या. माजी विद्यार्थिनी डॉक्टर शिल्पा कोडकीनी यांनी माझी शाळा गुरुकुलासारखी होती प्रभाताईनी घालून दिलेल्या शिस्तीमुळेच आणि त्यांनी पेरलेल्या बीजांची फळे आम्ही आज चाखत आहोत असे त्या म्हणाल्या. डॉ. श्रीशैल मेटगुड, उद्योजक सिद्धार्थ चंदगडकर, डॉ. संजय पोरवाल, सागर पाटणेकर यांनी आपली कृतज्ञतापर भाषणे केली कोरोनावरील लस ज्यानी शोधून काढली त्या अमेरिकेत स्थित असलेल्या डॉक्टर सुजाता नाडकर्णी या महिला विद्यालयाच्या दुसऱ्या बॅचच्या विद्यार्थिनी असून त्यांचे रेकॉर्डेड भाषण ऐकविण्यात आले. स्वामीजींचे अतिशय मौलिक असे विचार उपस्थितांना मंत्रमुग्ध करून गेले. संस्थेचे उपाध्यक्ष विवेक तिनईकर यांनी स्वामीजींचा परिचय करून दिला.

अध्यक्ष भगवानदास कपाडिया यांच्या अध्यक्षीय समारोपानंतर संस्थेचे सहसचिव सचिन बिच्चु यांनी आभार प्रदर्शन केले व्यासपीठावर सचिन बिचु, विवेक तिनईकर, मधुकर परांजपे, अशोक पोतदार अजित शानभाग, श्रीधर देशपांडे आदी संचालकासह प्राचार्य कविता या उपस्थित होत्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.