खानापूर समितीतील दोन्ही गटात एकी व्हावी या दृष्टिकोनातून माजी आमदार दिगंबर पाटील गटाच्या शिष्टमंडळाने मध्यवर्ती समितीच्या पदाधिकाऱ्यांशी एकी संदर्भात चर्चा केली.शनिवारी दुपारी बेळगावात ही बैठक झाली.
मध्यवर्ती समितीच्या वतीने अध्यक्ष दीपक दळवी,माजी आमदार मनोहर किणेकर, वकील राजाभाऊ पाटील,प्रकाश मरगाळे आणि माजी महापौर मालोजी अष्टेकर चर्चेत सहभागी झाले होते.
खानापूर म. ए. समितीच्या एकीच्या प्रक्रियेचा सविस्तर वृत्तांत मध्यवर्तीच्या पदाधिकाऱ्यांना सांगितला. त्याचबरोबर खानापूर तालुका समितीमध्ये एकी होणे ही काळाची गरज आहे. त्यामुळे मध्यवर्तीने स्वतः लक्ष घालून विखुरलेल्या खानापूर समितीमध्ये एकी घडवून आणावी, अशी मागणी या शिष्टमंडळाने भेटीदरम्यान केली आहे.यावेळी दिगंबर पाटील समिती गटाच्या पदाधिकाऱ्यांनी आपली कैफियत मध्यवर्ती समिती समोर मांडली.
त्यावर मध्यवर्ती समिती अध्यक्ष दीपक दळवी यांनी मध्यवर्तीला मानणाऱ्या गोपाळ देसाई गटाशी एकदा चर्चा करणार आणि मग त्या नंतर मध्यवर्ती पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून दोन्ही गट मध्यवर्ती सभासदांची एकत्र बैठक घेऊन दोघांचे म्हणणे ऐकून घेणार असल्याचे स्पष्ट केले.
दोन्ही गटांची बाजू ऐकून मराठी माणसाच्या एकजुटीसाठी एकी महत्वाची आहे.सीमा प्रश्नाच्या सोडवणुकीसाठी एकी महत्त्वाची आहे तुम्ही दोन्ही गटांनी मिळून एकी करावी अशी मध्यवर्तीची भूमिका आहे असे यावेळी सांगण्यात आले.
कोणत्याही निवडणुकांत उमेदवार ठरवण्याबाबत मध्यवर्ती समितीचा कोणताही सहभाग नसतो त्या घटक समित्यांनी त्या बाबत निर्णय घेण्यात येतात असे मध्यवर्तीच्या वतीने खानापूर समितीच्या शिष्टमंडळाला सांगण्यात आले.