केएलएस इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट एज्युकेशन अँड रिसर्च या संस्थेतील एमबीए तिसऱ्या सेमिस्टरच्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित ‘मनाचे परिणामकारक व्यवस्थापन’ या विषयावरील परिसंवादाचा कार्यक्रम नुकताच उत्साहात पार पडला.
सदर कार्यक्रमास संसाधन व्यक्ती म्हणून आयएमईआरच्या अंतर समुपदेशक वेदांती गोडबोले या उपस्थित होत्या. कोरोना महामारी नंतरच्या काळात व्यसन व्यवस्थापन, समाज विलगीकरण यासारख्या मानसिक आरोग्याच्या आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण झाल्या. एमबीए हा एक असा अभ्यासक्रम आहे ज्यामध्ये प्रचंड विचार मंथनाचा अंतर्भाव असतो. त्यासाठी हा अभ्यासक्रम शिकणाऱ्यांनी आपले मन ताजे आणि क्रियाशील ठेवणे गरजेचे असते.
त्या अनुषंगाने विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणे, तसेच भावना, मानसिक ताण आदींच्या बाबतीतील स्व:व्यवस्थापनाचे तंत्र कोणते? याची माहिती देणे, मानसिक आरोग्याच्या समस्येबाबत असलेले कांही गैरसमज दूर करणे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता.
वेदांती गोडबोले यांनी त्यानुसार आपले मार्गदर्शनपर विचार व्यक्त केल्यानंतर प्रश्नोत्तराचा कार्यक्रम खेळीमेळीत पार पडला. यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांनी अत्यंत मोकळेपणाने विचारलेल्या शंकांचे वेदांती गोडबोले यांनी निरसन केले.
प्रारंभी संस्थेचे मुख्य संचालक डॉ. आरिफ शेख यांनी प्रास्ताविक केले. त्याप्रमाणे कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. शैलजा हिरेमठ यांनी केले. कार्यक्रमास संस्थेच्या प्राध्यापक वर्गासह विद्यार्थी -विद्यार्थिनी बहुसंख्येने उपस्थित होते.