कंग्राळी खुर्द ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील स्वच्छतेच्या कामाकडे दुर्लक्ष झाले आहे. परिणामी डेंग्यूचे रुग्ण वाढवून नागरिकांचा जीव धोक्यात आल्यामुळे तीव्र संताप व्यक्त होत आहे.
कंग्राळी खुर्द ग्रामपंचायतमध्ये अलीकडे गावातील स्वच्छता पर्यायाने नागरिकांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. कचऱ्याची उचल, गटारांची साफसफाई आदी स्वच्छतेची कामे करण्याकडे आजकाल साफ दुर्लक्ष केले जात आहे.
परिणामी गावात ठिकठिकाणी अस्वच्छता व दुर्गंधीचे वातावरण निर्माण होण्याबरोबरच डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. डासांच्या वाढत्या उपद्रवामुळे गावकरी हैराण झाले असून गावात जंतुनाशक फवारणी करण्याची मागणी होत आहे.
डासांमुळे अनेक जणांना डेंग्यूची लागण झाली असून गावकऱ्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे. केवळ कंग्राळी खुर्द गावाचीच नव्हे तर ज्योती नगर आदी उपनगरातील,डेंग्यूची लागण झालेले गावातील रुग्ण सध्या खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत.
तरी आरोग्य खात्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याची गांभीर्याने दखल घेऊन स्वच्छता मोहीम राबविण्यात बरोबरच गावात युद्धपातळीवर जंतुनाशक फवारणी अथवा फाॅगिंग करावे, अशी जोरदार मागणी केली जात आहे.