गौंडवाड येथे प्राणघातक हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या आपला लढवय्या मित्र. सतीश पाटील याला बालपणीच्या त्याच्या वर्गमित्रांनी एका गरजू विद्यार्थिनींना शैक्षणिक मदत करण्याद्वारे आगळी श्रद्धांजली वाहिली आहे.
गौंडवाड गेल्या शनिवारी रात्री सतीश राजेंद्र पाटील या युवकाचा खून झाला. बालपणापासूनच मनमिळावू आणि सर्वांना मदत करण्याच्या वृत्तीचा सतीश पाटील आपल्या मित्रपरिवारात अत्यंत प्रिय होता.
धडाडी वृतीसह लढवय्या स्वभाव असल्यामुळे प्रत्येक सामाजिक कार्यात नेहमी आघाडीवर असणारा सतीश गरजू अड्याल्या नडलेल्यांच्या मदतीला धावून जात असे. त्याच्या आकस्मिक मृत्यूमुळे पाटील कुटुंबासह सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे.
या धक्क्यातून सावरताना मराठी विद्यानिकेतन शाळेमध्ये 1992 पासून 2002 पर्यंत एकत्र शिकलेल्या कै. सतीश पाटील याच्या वर्गमित्रांनी त्याच्या स्वभावाला अनुसरून त्याला आगळी श्रद्धांजली वाहिली आहे. सदर वर्गमित्रांनी कै. सतीश याच्या स्मरणार्थ एका गरजू विद्यार्थिनीला 30 हजार रुपयांच्या स्वरूपात शैक्षणिक मदत देऊ केली आहे.
सदर विद्यार्थिनी बारावीच्या परीक्षेत 81 टक्के गुण संपादन करून उत्तीर्ण झाली आहे. ज्योती महाविद्यालयांमध्ये विज्ञान शाखेत बीएससी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी तिला आर्थिक मदतीची अत्यंत गरज होती.
योगायोगाने याची माहिती कै. सतीश पाटील याच्या शाळेतील वर्ग मित्रांना मिळताच त्यांनी सर्वांनी मिळून आपल्या दिवंगत मित्राचे स्मरण करत त्या मुलीला 30 हजार रुपयांची मदत देऊ केली आहे. एका गरजू विद्यार्थिनीला अशाप्रकारे शैक्षणिक मदत करून आपल्या प्रिय मित्राला श्रद्धांजली वाहणाऱ्या संबंधित सर्व युवकांचे कौतुक होत आहे.