Friday, November 15, 2024

/

पाच शालेय अवलियांची सायकलवरून गडभ्रमंती!

 belgaum

बेळगाव लाईव्ह विशेष : हल्लीच्या मुलांना सर्व काही ‘फास्टफूड’ प्रमाणे अत्यंत घाईगडबडीने मिळविण्याची इच्छा असते. शाळकरी मुलांमध्येही घरापासून थेट शाळेपर्यंत आणि शाळेपासून थेट घरापर्यंत पोहोचविण्यासाठी दररोज रिक्षा ची गरज असते. मात्र बेळगावमधील पाच शालेय अवलियांनी बेळगाव ते पन्हाळगड मोहीम सायकलवरून आखली आहे, आणि आजकालच्या नव्या पिढीच्या फास्ट आयुष्याला हा अपवाद ठरला आहे.

कंग्राळी खुर्द या भागातील १६ ते १८ वयोगटातील पाच मुलांनी बेळगाव ते पन्हाळगड मोहीम सायकलवरून करण्याचे ठरविले. दररोजच्या आयुष्यातून काहीतरी हटके करावे, जेणेकरून शरीराला व्यायामही मिळेल, आणि सर्वात महत्वाचे म्हणजे छत्रपती शिवरायांच्या स्वराज्यातील एक गड देखील जवळून पाहता येईल, या उद्देशाने ही मोहीम आखली गेली. विशेष म्हणजे या सायकल मोहिमेत प्रत्येकाने आपल्या सुरक्षेची योग्य ती काळजी घेतली.

शनिवार आणि रविवार हे दोन सुट्टीचे दिवस ठरवून समर्थ देसाई (वय १८), विवेक पाटील (वय १८) अमित रेड्डी (वय १७) प्रथमेश पाटील ( वय १७), साहिल पाटील (वय १६) या पाचही शाळकरी मुलांनी शनिवारी आपापल्या सायकलीवरून बेळगाव सोडले. त्यानंतर थेट कोल्हापूर आणि पन्हाळा प्रवास करत शनिवारी पन्हाळगडावर मुक्काम केला.Kille panhala

सोबत घरातून आणलेली शिदोरी आणि पन्हाळ्यावरील अंबाबाई देवस्थानात मुक्काम अशा पद्धतीने रात्र पाचही मित्रांनी गडावरच घालविली. पहाटे ६ ते ७ च्या सुमारास पुन्हा आपल्या सायकलींवरून संपूर्ण पन्हाळगडाच्या फेरफटका मारत छत्रपती शिवरायांच्या मोहिमेची माहिती घेतली.

ग्लोबल वॉर्मिंग आणि इंधन वाचविण्याच्या उद्देशाने आज देशभरात अनेक अवलिया सायकलवरून संदेश देत भ्रमंती करतात. सायकल वापरामुळे शरीराला व्यायाम मिळतो आणि शरीर सुदृढ बनते हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून बेळगावमधील या पाच शाळकरी मुलांनी बेळगाव ते कोल्हापूर दरम्यान सायकलवरून केलेला प्रवास हा खरोखरच कौतुकास्पद आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.