बेळगावच्या चित्रपट निर्मात्यांनी बनविलेल्या संस्कृत मधील पहिल्या एलजीबीटीक्यू + लघुपटाला मुंबई येथील कशिष आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये प्रदर्शित होण्याचा सन्मान प्राप्त झाला आहे
मुंबई येथे होत असलेल्या 13 व्या कशिष मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी बेळगावच्या चित्रपट निर्मात्यांनी बनवलेला ‘बालभूषणानी’ हा पहिला संस्कृत एलजीबीटीक्यू+ लघुपट दाखवण्यात आला. या वर्षी या महोत्सवात 53 देशातून आलेले निवडक 184 पेक्षा अधिक चित्रपट दाखविले जात आहेत.
जुनचा महिना एलजीबीटीक्यू समुदायासाठी अभिमानाचा महिना असतो. दरवर्षी ‘कशिष’ विषयी जागरूकता करण्यासाठी हा चित्रपटमहोत्सव आयोजित केला जातो. यावर्षी 1 ते 5 जून या कालावधीत मुंबई येथील सुप्रसिद्ध लिबर्टी सिनेमा या चित्रपटगृहात हा चित्रपटमहोत्सव होत आहे.
सदर महोत्सवाचे उदघाटन बॉलिवूड अभिनेत्री दिव्या दत्ता हिच्या हस्ते करण्यात आले. त्याचप्रमाणे प्रसिध्द बॉलिवूड अभिनेता राजकुमार राव याने देखील महोत्सवाच्या दुसऱ्यादिवशी आपली उपस्थिती दर्शवली.
‘बालभूषणानी’ या संस्कृत लघुपटाची कथा सौ. मेधा मराठे यांची आहे, तर त्याचे संस्कृत भाषांतर डाॅ. आशा पाठक- गुर्जर यांनी केले आहे. या लघुपटात अभिजित देशपांडे, अमेय पाटणकर, आरती आपटे आणि मेधा मराठे यांच्या प्रमुख भूमिका आहेत. या लघुपटाचे छायाचित्रण आणि संकलन आयलाईन पिक्चर्सचे संकेत कुलकर्णी यांनी केले असून पटकथा आणि दिग्दर्शन चिन्मय सुधीर शेंडे यांचे आहे.