आपल्या मुलांपर्यंत 21 व्या शतकातील कौशल्य पोहोचवायचे असेल तर आपल्याकडील शिकवण्याच्या पद्धतीत बदल होणे ही काळाची गरज आहे. एक प्रभावी शिक्षकच एखाद्या मुलाचे भविष्य बदलू शकतो, हे ध्यानात घेऊन आम्ही शिक्षकांना नाविन्यपूर्ण अध्यापन पद्धती देण्याचा उपक्रम राबवत आहोत. हा उपक्रम महाराष्ट्रात यशस्वी झाला असून आता बेळगावातदेखील हा उपक्रम राबविण्याचा आमचा विचार आहे, अशी माहिती सेंटर फॉर इक्विटी अँड क्वालिटी इन युनिव्हर्सल एज्युकेशन या महाराष्ट्रातील बिगर सरकारी संस्थेच्या (एनजीओ) मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) उमा कोगेकर यांनी दिली. बेळगाव तालुका परिसरातील बेळगुंदी येथील शून्य मध्ये सिखे टीम प्रशिक्षण कार्यशाळा पार पडली. सिखे टीम वर्षभर शिक्षकांना कोचिंग कार्यशाळा घेत असते. त्यानिमित्ताने ‘बेळगाव लाईव्ह’ने घेतलेल्या खास मुलाखतीप्रसंगी त्या बोलत होत्या.
सीईओ उमा कोगेकर म्हणाल्या की, आमची सेंटर फॉर इक्विटी अँड क्वालिटी इन युनिव्हर्सल एज्युकेशन ही संस्था गेली 10 वर्षे शिक्षकांच्या प्रशिक्षणासाठी कार्यरत आहे. प्रत्येक विद्यार्थ्याला उत्तम शिक्षक मिळावे, हे आमचे ध्येय आहे. जर शिक्षणाचा दर्जा उंचावण्याचा असेल, प्रत्येक मुलाला शिकतं करायचं असेल तर त्यावर एकमेव पर्याय म्हणजे शिक्षक हा होय! संशोधन देखील हेच सांगते की शाळांच्या बाबतीत सर्वात महत्त्वाचा घटक आहे तो म्हणजे ‘शिक्षक’. आणि एक प्रभावी शिक्षकच एखाद्या मुलाचे भविष्य बदलू शकतो, हे ध्यानात घेऊन ही संकल्पना समोर ठेवून आमच्या संस्थेची स्थापना केली आहे.
आमची संस्था तीन टप्प्यात आपले उपक्रम राबवते. त्यापैकी पहिल्या टप्प्यात संस्था थेट शिक्षकांसमवेत काम करते. प्रामुख्याने जि. पं. शाळा, पालिकेच्या शाळा किंवा कमी उत्पन्नाच्या शाळेतील शिक्षकांसोबत आम्ही काम करतो. या पहिल्या उपक्रमाला ‘टीचर इनोव्हेटर प्रोग्रॅम’ अर्थात शिक्षक नवकल्पना कार्यक्रम असे म्हटले जाते. सदर कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यातील निवडलेल्या एका तालुक्यातील 100 शाळांमधील सुमारे 300 शिक्षकांसह जवळपास 6000 मुलांचा अंतर्भाव असतो. प्रारंभीची 3 ते 5 वर्षे स्थानिक प्रशासनाच्या सहकार्याने शिक्षकांच्या प्रशिक्षणाचे कार्यक्रम राबविले जातात. या प्रशिक्षणातर्गत शिक्षकांना नाविन्यपूर्ण अध्यापन पद्धती दिल्या जातात. त्याचप्रमाणे वर्षभर त्याचे प्रशिक्षणही दिले जाते. याव्यतिरिक्त मुलांना शैक्षणिक साहित्य दिले जाते. कार्यक्रमाच्या शेवटी मुलं काय शिकली? हे त्यांचे पालक आणि गावातील जाणकार मंडळी पडताळून पाहू शकतात, असे कोगेकर म्हणाल्या.
आतापर्यंत या कार्यक्रमांतर्गत आम्ही 6000 शिक्षक आणि पर्यायाने लाखो मुलांपर्यंत पोचलो आहोत. आता आमची हळूहळू बेळगावमध्ये काम करण्याची इच्छा आहे. कारण महाराष्ट्रातील 10 वर्षाच्या कालावधीत आमचा उपक्रम अत्यंत यशस्वी झाला आहे. आम्हाला मुलांच्या शैक्षणिक गुणवत्तेत वाढ झाल्याचे दिसून आले आहे.
आता आमच्या या उपक्रमाचा अन्य राज्यातील मुलांना देखील लाभ व्हावा अशी आमची इच्छा आहे. बेळगाव मध्ये देखील मराठी माध्यमाच्या शाळा आहेत, त्यामुळे इतर राज्यातील शिक्षकांना देखील एक दर्जेदार प्रशिक्षण घेण्याची संधी मिळावी या अनुषंगाने आम्ही कर्नाटकात विशेष करून बेळगावात प्रवेश करण्याचा विचार करत आहोत.
शिक्षक साधारणपणे एका चाकोरीत विचार करतात किंवा ठराविक पारंपारिक पद्धतीने शिकवत असतात. ज्यामध्ये मुलांना विचार करण्याची संधी किंवा ज्याला आपण शिकता वर्ग म्हणतो ते आढळून येत नाही. अनेक वर्षे एकाच पद्धतीने मुलं शिकत आली आहेत. आजपर्यंतच्या अनेक सर्वेक्षणात असे दिसून आले आहे की आपणाला शिकण्याच्या संकटाचा (लर्निंग क्रायसेस) सामना करावा लागत आहे. आपली मुले शिकत नाहीत हे या सर्वेक्षणातून स्पष्ट झाले आहे.
कोरोना महामारीमुळे शाळा बंद असल्याने ही समस्या अधिकच प्रकर्षाने जाणवत आहे. आपली मुलं आणखी मागे पडत आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर शिक्षकांनी कांही नवीन पद्धती वापरून मुलांना शिकतं करण्याचा प्रयत्न करणे अत्यावश्यक बनले आहे. नवे शैक्षणिक धोरण ही आपल्याला हेच सांगते की आपल्या मुलांना 21 व्या शतकातील कौशल्यं (स्किल्स) द्यायची आहेत. मुलांना सहयोग, संकट, गंभीर विचार करणे अशा सगळ्या गोष्टींमध्ये सक्षम करावयास हवे. अशावेळी आमचा जो उपक्रम अथवा कार्यक्रम आहे तो शिक्षकांसाठी उपयोगी ठरतो, असे सांगून त्यासाठी महाराष्ट्रातील गडचिरोली, चंद्रपूर, नाशिक, पालघर आणि ठाणे अशा पाच जिल्ह्यांमध्ये सेंटर फॉर इक्विटी अँड क्वालिटी इन युनिव्हर्सल एज्युकेशन संस्था कार्यरत आहे, असे संस्थेच्या सीईओ उमा कुगेकर यांनी शेवटी स्पष्ट केले. यावेळी संस्थेच्या अधिकारी अर्चना शिंदे यांनीही सिखे टीमच्या कार्यशाळेत मार्गदर्शन केले.