अग्निपथ विरोधात बंदची हाक दिल्याच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण बेळगाव शहरात कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. अनेक ठिकाणी व्हिडिओ शूटिंग केले जात असून ड्रोन कॅमेरांद्वारे शहरावर नजर ठेवण्यात येत असल्याची माहिती पोलिस आयुक्त डाॅ. एम. बी. बोरलिंगय्या यांनी सोमवारी दिली.
केंद्र सरकारच्या अग्निपथ योजनेच्या विरोधात काही युवक व संघटनांनी समाज माध्यमातून बंदची हाक दिली आहे. या पार्श्वभूमीवर ठेवण्यात आलेल्या व्यापक पोलिस बंदोबस्त बाबत माहिती देताना पोलीस आयुक्त डाॅ. बोरलिंगय्या बोलत होते.
समाज माध्यमांद्वारे काहिंनी बेळगाव बंदची हाक दिल्याने तसेच आज काहींनी शहरात आंदोलन करण्याची तयारी चालवली असल्याची माहिती मिळाली होती. यासाठी कोणीही पोलिसांकडे पूर्वानुमती मागितलेले नाही. त्यामुळे बंद अथवा आंदोलनांमुळे शांतता भंग होऊन जनतेला त्रास होऊ नये यासाठी आज सर्वत्र कडक पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. यासाठी गेल्या तीन दिवसांपासून नियोजन केले जात आहे.
आमचे अधिकारी आज शहरात गस्त घालून जनतेला सुरक्षा उपलब्ध करून देण्याचे काम करत आहेत. सुरक्षा व्यवस्था अधिक बळकट व्हावी यासाठी कांही ठिकाणी व्हिडिओ शूटिंग करण्यात येत आहे. त्याशिवाय ड्रोन कॅमेऱ्यांचाही वापर करण्यात येत आहे. शहरातील चन्नम्मा चौक, रेल्वे स्थानक, बस स्थानकं आणि गर्दीच्या ठिकाणी जादा पोलीस कुमक ठेवण्यात आली आहे.
जनतेला विनाकारण त्रास घेणाऱ्यांची गय केली जाणार नाही, त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल. विनाकारण बंद पाळून कोणीही जनतेला त्रास देऊ नये. आपल्या भविष्याचा विचार करून युवकांनी आंदोलनात सहभागी होऊ नये, असे आवाहन करण्याबरोबरच आज सकाळी 8 वाजल्यापासून आमचे अधिकारी व पोलीस गस्त घालत असून अनुचित प्रकार हाणून पाडण्याची सर्व तयारी केली आहे.
नाकाबंदी करून उपाय योजना केली जात आहे, असेही पोलीस आयुक्त डॉ. एम. बी. बोरलिंगय्या यांनी सांगितले.