देसुर रेल्वे स्थानकानजीकच्या गूडशेड गोदामातील 900 खत पोत्यांच्या चोरी प्रकरणाचा छडा लावण्यात बेळगाव ग्रामीण पोलिसांना यश आले आहे. पोलिसांनी 5 जणांना गजाआड केले असून त्यांच्याकडील खताची पोती आणि ट्रक असा 25,93,500 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
नागराज केरण्णा पठात (वय 21, रा. हलगीमर्डी, ता. जि. बेळगाव), पंडित कल्लाप्पा सनदी (वय 37, रा. लक्केबैल, ता. खानापूर, जि. बेळगाव) वासिम इस्माईल मकानदार (वय 23, रा. न्यू वंटमुरी, ता. जि. बेळगाव), मंजुनाथ सोमप्पा हणमन्नावर वय 30, रा. लक्केबैल, ता. खानापूर, जि. बेळगाव) आणि गजबरअली गौसमुद्दीन चिड्डीमनी (वय 39, रा. हुदली, ता. जि. बेळगाव) अशी पोलिसांनी अटक केलेल्या 5 जणांची नावे आहेत.
देसुर रेल्वे स्थानकानजीकच्या गुडशेड गोदामातून गेल्या 23 मे 2022 रोजी अत्यंत शिताफीने आरसीएफ कंपनीची तब्बल 900 खताची पोती चोरट्यांनी लंपास केली होती. एका रात्रीत लाखो रुपये किमतीच्या डीएपी खताची चक्क 900 पोती कानोकान खबर न होता लंपास करण्यात आल्यामुळे हा एक चर्चेचा विषय झाला होता. याप्रकरणी गोदामाचे व्यवस्थापक शिवाजी बाळाराम आनंदाचे यांनी बेळगाव ग्रामीण पोलीस स्थानकात फिर्याद दाखल केली होती.
फिर्याद दाखल होताच पोलिसांनी तात्काळ तपास कार्य हाती घेतले होते. अखेर वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली बेळगाव ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्रीनिवास हांड यांनी आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने काल गुरुवारी उपरोक्त 5 जणांना अटक केली.
त्याचप्रमाणे त्यांच्याकडील चोरीला गेलेली आरसीएफ कंपनीची 10,93,500 रुपये किमतीची 810 खताची पोती, याखेरीज चोरी करण्यासाठी वापरलेले 15,00,000 रुपये किमतीचे दोन ट्रक असा एकूण 25,93,500 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. सदर कारवाईबद्दल वरिष्ठ अधिकाऱ्यांनी बेळगाव ग्रामीण पोलिसांना शाबासकी दिली आहे.