कोरोनामुळे गेल्या दोन वर्षापासून लष्कर भरती परीक्षा (आर्मी एक्झाम) झालेल्या नाही. परिणामी आमचे युवक बेरोजगार होत असल्यामुळे ही परीक्षा लवकरात लवकर घ्यावी, अशी मागणी अखिल कर्नाटक माजी सैनिक संघटनेतर्फे केंद्र सरकारकडे करण्यात आली आहे.
अखिल कर्नाटक माजी सैनिक संघटनेतर्फे उपरोक्त मागणीचे निवेदन केंद्र सरकारकडे धाडण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर करण्यात आले.
जिल्हाधिकाऱ्यांच्या सहाय्यकांनी निवेदनाचा स्वीकार करून पुढील योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले. याप्रसंगी उपस्थित माजी सैनिकांकडून बोलो भारत माता की जय, जय जवान जय किसान, वंदे मातरम या घोषणा दिल्या जात होत्या.
देशात बेरोजगारांची संख्या वाढत आहे. यात भर म्हणून गेल्या दोन वर्षापासून कोरोनामुळे लष्कर भरतीची परीक्षा झालेली नाही. सदर परीक्षा होत नसल्यामुळे त्याचा फटका लष्करात भरती होऊ इच्छिणाऱ्या युवकांना बसत आहे. त्यांची परीक्षेसाठी आवश्यक असलेली वयोमर्यादा उलटून जात आहे.
तेंव्हा संबंधित युवकांचे भवितव्य सुरक्षित करण्यासाठी सरकारने लवकरात लवकर लष्कर भरती परीक्षा घ्यावी, अशी आमची मागणी असल्याचे अखिल कर्नाटक माजी सैनिक संघटनेच्या एका पदाधिकाऱ्याने प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना सांगितले.