बेळगाव शहरातील दोन भाजी मार्केटमधील वाद सोडविण्याच्या दृष्टिकोनातून बेळगावचे नवे जिल्हाधिकारी नितेश पाटील तात्काळ एपीएमसी भाजी मार्केट मधील व्यापाऱ्यांची भेट घेऊन त्यांना न्याय द्यावा, या मागणीसाठी व्यापारीवर्गाने आज शुक्रवारी एपीएमसी कार्यालयासमोर जोरदार निदर्शने करत धरणे सत्याग्रह केला.
शहरातील सरकारचे एपीएमसी भाजी मार्केट आणि गांधीनगर येथील वादग्रस्त जय किसान होलसेल भाजी मार्केट यांच्यातील वाद अद्यापही कायम आहे सदर वाद सोडविण्यासाठी या पूर्वीचे जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ प्रयत्नशील होते. मात्र अलीकडेच त्यांची बदली झाली असून त्यांच्या जागी आलेले नवे जिल्हाधिकारी नितेश पाटील यांना या ना त्या कारणास्तव अद्याप भाजी मार्केटच्या वादाकडे गांभीर्याने लक्ष देता आलेले नाही.
मात्र यामुळे एपीएमसी भाजी मार्केटमधील व्यापारी नाराज झाले असून जिल्हाधिकार्यांच्या भेटीसाठी आज शुक्रवारी त्यांनी एपीएमसी कार्यालयासमोर धरणे आंदोलन छेडले आहे. जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी तात्काळ एपीएमसी येथील व्यापाऱ्यांची भेट घेऊन त्यांची व्यथा जाणून घ्यावी तसेच दोन्ही भाजी मार्केटमधील वाद निकालात काढून आपल्याला न्याय द्यावा अशी आंदोलनकर्त्या व्यापाऱ्यांची मागणी आहे.
यासाठी आज आंदोलनस्थळी जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात येत होती. असिफ कलमनी, सतीश पाटील, विनोद राजगोळकर, बसनगौडा पाटील, मोहसीन धारवाड, सदानंद पाटील, संजीव सिद्रामनी आदी बहुसंख्य व्यापाऱ्यांनी धरणे सत्याग्रहात भाग घेतला आहे. भाजी व्यापाऱ्यांचे सकाळी सुरू झालेले हे आंदोलन दुपारपर्यंत सुरू होते.
एपीएमसी भाजी मार्केट आणि जय किसान होलसेल भाजी मार्केट यांच्यातील वाद निकालात काढण्याच्या दृष्टिकोनातून गेल्या 5 जून रोजी सायंकाळी 4 वाजता तत्कालीन जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांनी आम्हाला बैठकीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात बोलावले होते. त्यानुसार आम्ही एपीएमसीमधील प्रमुख व्यापारी त्यांची भेट घेण्यासाठी गेलो होतो. मात्र दरम्यान त्यांच्या बदलीचा आदेश आल्यामुळे ते बैठकीसाठी आले नाहीत. त्यानंतर त्यांच्या जागी नियुक्त झालेले नुतन जिल्हाधिकारी नितेश पाटील यांची आम्ही तीन-चार वेळा भेट घेण्याचा प्रयत्न केला होता.
परंतु ते निवडणुकीच्या कामात व्यस्त असल्यामुळे त्यांची भेट होऊ शकली नाही. आता निवडणूक समाप्त झाली आहे, तेंव्हा जिल्हाधिकार्यांनी तात्काळ आमची भेट घेऊन आम्हाला न्याय मिळवून द्यावा, अशी आमची मागणी आहे आणि त्यासाठीच आज आम्ही हे आंदोलन छेडले आहे, असे एपीएमसी भाजी मार्केटमधील व्यापारी आसिफ कलमनी यांनी बेळगाव लाईव्हशी बोलताना सांगितले.